रस्त्यात अडवून अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन : तरुणाला अटक

0
510

काळेवाडी, दि. ८ (पीसीबी) – दूध आणण्यासाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याची घटना 24 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली. याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

देविदास अशोक लेहे (वय 24, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी बाहेर गेली. ती दूध घेऊन परत घरी येत असताना आरोपीने तिला आवाज दिला. ‘मला तुझ्यासोबत बोलायचे असल्याचे त्याने सांगितले असता मुलीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. तसेच घरच्यांना आरोपीबाबत सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. आरोपीने यापूर्वी देखील पीडित मुलीचा शाळेपर्यंत पाठलाग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.