रमजान महिन्यात लोकसभा निवडणूक, तारखा बदला; मुस्लिम नेत्यांची मागणी

0
798

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा रविवारी (दि.१०) जाहीर केल्या आहेत. मात्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. त्यामुळे या तारखा बदलल्या जाव्यात, अशी मागणीही  मुस्लिम नेते आणि मौलवीं यांनी केली आहे.

कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम म्हणाले की,  ७ टप्प्यात होणाऱ्या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी कठीण  आहेत.  रमजान महिन्यात तारखा काढल्याने या निवडणुकीत सर्वाधिक त्रास मुस्लिमांना होईल.

इस्लामिक विद्वान, लखनौ ईदगाहचे इमाम मौलाना खालीद रशीद फिरंगी महली यांनीही  मतदानाच्या तारखा या रमजान पूर्वी किंवा ईदनंतर ठेवण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे  केली आहे. ५ मे रोजी रमजान मुबारकचा चंद्र दिसू शकतो.  तर ६ मेपासून रमजानचा महिना सुरु होईल. तिन्ही तारखा या रमजानच्या महिन्यात येतील. त्यामुळे मुसलमानांना अडचणीचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

या तीन राज्यात अल्पसंख्यकांची लोकसंख्या जास्त असल्याने अल्पसंख्यकांनी मतदान करु नये, अशी भाजपची इच्छा आहे. याचीही निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, असे म्हटले आहे.