हडपसर पोलिसांवर गंभीर आरोप करुन तरुणाची आत्महत्या

0
854

हडपसर, दि. ११ (पीसीबी) – जमीन व्यवहारात फसवणुक झाल्यामुळे तसेच पोलिसांनी या प्रकरणात अपली मदत न केल्यामुळे नैराश्य आलेल्या एका विवाहित तरुणाने हडपसर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करुन सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली.

स्वप्नील दशरथ सपकाळ (वय ३३, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

प्राप्त माहितीनुसार, स्वप्नील सपकाळ हे गोंधळेनगर येथे रहात असून त्यांना एक मुलगी आहे. त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. रविवारी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तपासादरम्यान त्याच्या घरात सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी प्लॉट देणारा, हडपसर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्यावर आरोप करुन त्यांना सोडू नका असे म्हटले आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी सांगितले की, हे सर्व २०१७ मधील प्रकरण असून त्याचवेळी सपकाळ यांच्या अर्जाची चौकशी करुन त्यांना ही दिवाणी बाब असल्याने आपण न्यायालयात जावे, अशी समज दिली असून त्या समजपत्रावर त्यांची सही सुद्धा आहे.

स्वप्नील सपकाळ याने २०१६ मध्ये राजेंद्र मोरे याच्याकडून प्लॉट घेतला होता. त्यासाठी कर्ज काढले होते. त्या प्रकरणात आपली फसवणूक झाली असून मोरे यांनी दिलेले चेक न वटता परत आले. त्याबाबत सपकाळ याने हडपसर पोलिसांकडे २०१७ मध्ये अर्ज केला होता. त्याची चौकशी करुन ही दिवाणी बाब असल्याचे समजपत्र पोलिसांनी दिले होते. गुन्हा दाखल न करता पोलिसांनी आपल्याला पैसे मिळवून द्यावेत, असे त्याचे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्वप्नीलचे नातेवाईक पुण्यात आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.