‘रक्तदाना’ची नितांत गरज; आता राज्यात रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनपाठोपाठ रक्ताची कमतरता

0
184

पिंपरी, दि.२९ (पीसीबी) : एरव्ही सुद्धा उन्हाळ्यात रक्तदान कमीच होत असते. त्यात कोरोनामुळे त्याने आतापर्यंतच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड यावेळी केला आहे. हा पहिलाच उन्हाळा असा आहे, की त्याने शहरातच नाही, तर राज्यातही प्रथमच निचांकी रक्तदानाही नोंद झाली आहे. कोरोनामुळे रक्तदान कमी झाल्याचे वा त्यावर विपरित परिणाम झाल्याचे सांगितले, तर विश्वास बसणार नाही ना? पण, ते खरे आहे. पालिका व खासगी रक्तपेढीतूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. राज्यात, सध्या रेमडेसिव्हिर, ऑक्सिजनची अधिच कमतरता आहेच पण आता रक्तांसाठी सुद्धा रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण करावी लागणार आहे.

कोरोनाचा फटका सर्व स्तरांना बसला असून त्यातून रक्तदान करणारेही सुटलेले नाहीत. त्यामुळे रक्तटंचाईला शहरासह राज्यालाही सध्या तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, कोरोनामुळे तातडीच्या वगळता इतर शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. परिणामी यावेळच्या उन्हाळ्यात कधी नव्हे, ती रक्ताला मागणीही पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. ही समाधानाची बाब म्हणता येईल. फक्त कोरोना रुग्णांना लागणाऱ्या रक्तातील प्लाझ्मा या घटकाला,मात्र कधी नव्हे ती प्रचंड मागणी आहे. मात्र, कोरोनाने रक्तदान शिबिरे रोडावल्याने प्लाझ्म्यासाठी दात्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याची पाळी कधी नाही,ती आली आहे. श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्लाझ्मा देणाऱ्याला दोन हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.तर, महापौर माई ढोरे या सुद्धा वैयक्तिक प्रत्येक प्लाझ्मादात्याला एक हजार देत आहेत. तरुणाई ही रक्तदानात आघाडीवर असते. मात्र, उन्हाळी सुट्टीत ती आपापल्या गावी जाते. इतर रक्तदाते चाकरमानीही हीच वाट चोखाळतो. त्यामुळे उन्हाळ्यात रक्तदान कमी होते. त्यात यावर्षी उन्हाळा सुरु झाला आणि दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमही सुरु झाली. त्याचा आणखी फटका रक्तदानाला बसला. कारण या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवस व दुसऱ्या डोसनंतर २८ दिवस म्हणजे जवळजवळ दोन महिने ती घेणाऱ्याला रक्तदान करता येत नाही.