योगा करणे पडले चांगलेच महागात; ११० हाडे तुटली !

0
685

मेक्सिको, दि. २८ (पीसीबी) – मेक्सिकोतील एका कॉलेज विद्यार्थिनीला योगा करणे चांगलेच महागात पडले आहे. घराच्या बाल्कनीत योगाचे एक आसन करताना ही मुलगी इमारतीतून ८० फूट खाली कोसळली. तिची ११० हाडे तुटली असून यातून बरे होऊन चालू लागायला तिला किमान तीन वर्षं लागणार आहेत.

अलेक्सा टेरेझा असे या मुलीचे नाव आहे. मेक्सिकोतील सॅन पेड्रो येथे ती राहते. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर तिचे घर आहे. घराच्या बाल्कनीत ती योगा करत होती. तिचा योगा सुरू असताना ज्या आसनाच्या वेळी ती तोल जाऊन पडली, त्या क्षणाचा फोटो तिच्या मित्राने कॅमेऱ्यात कैद केला. तिला जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर ११ तास सर्जरी सुरू होती. तिच्या गुडघ्यांना आणि पायाच्या घोट्याला जबर दुखापत झाल्याने तिला स्वत:च्या पायावर उभे राहून चालण्यासाठी किमान ३ वर्षं लागतील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.