‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार – अजित पवार

0
456

महाराष्ट्र,दि.१(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात महाविकासआघाडीवर टीका करणाऱ्या व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ‘ये दिवार तुटती क्यू नही…’ असं म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे. ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे अंबुजा… एसीसी… बिर्ला सिंमेटसे जो बनी है” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आमच्या सरकारने कुठलीही विकास कामे थांबवली नाहीत.ज्या कामांच्या बाबतीत शंका येते, म्हणजे समाजाच्या भल्यासाठी जी विकासकामे नाहीत हे लक्षात आल्यावर अशी कामे थांबवली आहेत. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

दरम्यान, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. दहा आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत. यावेळी महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल असेही ते म्हणाले.