या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा – छगन भुजबळ

0
174

नाशिक,दि.०५(पीसीबी) – राज्यातील विधानपरिषद निवडणुकीतील पराभवातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी आता जमिनीवर उतरून काम करायला हवे. देशात आता ईडी आणि सीबीआयच्या दमदाटीचे राजकारण चालणार नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. ते शनिवारी लासलगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे चमत्कार झाला. तिन्ही पक्षांची युती झाल्यामुळे मते विभागली गेली नाहीत. या निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने महाविकासआघाडीला स्वीकारलेले दिसले. अगदी पुणे आणि नागपूर या भाजपच्या बालेकिल्ल्यातही मतदारांनी महाविकासआघाडीच्या बाजूने कौल दिला. या सगळ्यातून भाजपने धडा घ्यायला हवा. त्यांनी जमिनीवर उतरून काम करायला हवे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

दरम्यान मी शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिकांनी माझ्यावर हल्ला केला होता. मला कोणी याविषयी विचारले तर मी सांगतो. याचा अर्थ मी शिवसेनेवर टीका करतो, असा नाही. आता ती गोष्ट इतिहासजमा झाली. आम्ही आता राज्यात एकत्रितपणे काम करत आहोत, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.