`या` बड्या नेत्याचा सवाल राज्याचे मुख्यमंत्री कोण उध्दव ठाकरे की अजित पवार ?

0
305

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – थकित वीज बिलांच्या प्रश्नांवरुन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री नेमकं कोण आहे उद्धव ठाकरे की अजित पवार हे एकदा स्पष्ट करा असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. तसंच वाढीव वीज बिलांच्या माफीवरुन सरकारने घूमजाव केलं आहे. ग्राहकांनी वाढीव वीज बिल भरु नये असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. वीज जोडण्या तोडल्या गेल्या तर वंचित बहुजन आघाडी त्या जोडण्या पुन्हा जोडून देईल.

महावितरणनेच हे सांगितलं आहे की लॉकडाउनच्या काळात मीटर रिडिंगसाठी कंत्राट दिलं होतं. त्यांना बंदी घालण्यात आली नव्हती तर स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मीटर रिडिंगच्याबाबतीत आमच्याकडून चूक झाली आहे. ५० टक्के वीज बिल माफीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवला आहे असंही महावितरणने सांगितल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

मार्च २०२० ला ५१ हजर ९४६ कोटी इतकी थकबाकी होती. मात्र २०१४ ला ही थकबाकी निम्म्याहून कमी होती असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसंच वीज बिल माफीवरुन या सरकारने ग्राहकांची फसवणूक केली आहे. कारण एप्रिलपासून जी बिलं आली आहेत त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. ही वाढ कुणाच्या सांगण्यावरुन केली? कशी केली ते सरकारने स्पष्ट करावं अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.