बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

0
236

कासारवाडी,दि.२३(पीसीबी) – बीआरटी बस स्टॉपला भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने धडक दिली. यामध्ये बस स्टॉपचे लोखंडी दरवाजा आणि बॅरीकेड तुटून नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पावणे तीन वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी जकात नाका बस स्टॉपवर घडली.

सुभाष कुमार रामप्रसादबिंद (वय 26, रा. मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत नारायण विठ्ठल वाडे (वय 33, रा. पोकासार आंबोली, ता. मुळशी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुभाष हा कंटेनर चालक आहे. तो रविवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पिंपरी कडून पुण्याच्या दिशेने कंटेनर (एम एच 14 / जे के 2865) घेऊन जात होता. त्याने भरधाव वेगात कंटेनर चालवून फुगेवाडी जकात नाका बस स्टॉपला जोरात धडक दिली. यामध्ये बीआरटी बस स्टॉपच्या लोखंडी दरवाजाचे नुकसान झाले. तसेच पाच बॅरिकेड चेंबून, तुटून त्याचेही नुकसान झाले आहे.

सुदैवाने ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बीआरटी बस स्टॉपवर दिवसभर अनेक प्रवासी प्रवासासाठी थांबलेले असतात. तसेच बीआरटी बस देखील सुरु आहेत. रात्रीच्या वेळी बस बंद असल्याने कोणताही धोका निर्माण झाला नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.