या देशात गरुड आणि घुबड करतात ‘या’ देशाच्या राष्ट्रपती भवनाचे सुरक्षारक्षण

0
365

सर्वसाधारणपणे आपण हे पाहिले असेलच की कोणत्याही देशात पंतप्रधान किंवा राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेची जबाबदारी ट्रेंड कमांडो किंवा लष्कराची असते. राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधानांची सुरक्षा इतकी कडक असते की, तिथे साधं चिलटं सुद्धा आपल्याला दिसत नाही. परंतु आज आपण अश्या देशाबद्दल जाणून घेणार आहोत, जेथे राष्ट्रपती भवनाचे संरक्षण ‘स्वतः पक्षी’ करतात, कारण यासाठी सुद्धा एक खास कारण आहे.

प्रत्यक्षात, देशाच्या संरक्षण विभागाने रशियाचे राष्ट्रपती भवन क्रेमलिन आणि जवळील प्रमुख सरकारी इमारतींच्या संरक्षणासाठी पक्षी ठेवले आहेत. या पक्ष्यांमध्ये घुबड आणि गरुड यांचा समावेश आहे. गरुड व घुबडांची एक खास टीम इथली सुरक्षा योग्यरितीने हाताळते. देशाच्या संरक्षण विभागाने राष्ट्रपती भवनच्या कडेकोट सुरक्षेसाठी एक खास पथक तयार केले आहे. शिकारी पक्ष्यांची ही टीम १९८४ पासून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत खंबीरपणे उभी आहे. या संघात सध्या 10 हून अधिक बहिरी ससाणा, गरुड आणि घुबड असल्याचे सांगण्यात येत आहे. या ससाण्यांना व घुबडांना सुरक्षेसाठी विशेष प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या शिकारी पक्ष्यांची ही खास टीम १९८४ मध्येच तयार झाली होती. हा खास संघ बनवण्यामागील कारण म्हणजे कोणत्याही शत्रूला किंवा शत्रूच्या आक्रमणाला नष्ट करणे नव्हे, तर राष्ट्रपती आणि सरकारी इमारतींना इतर पक्ष्यांच्या घाणीपासून वाचवणे होय. त्यासाठी या गरुड आणि घुबडांना इथे तैनात केले गेले आहे. येथील सरकारी इमारती आणि भवनाच्या परिसरात हे गरुड आणि घुबड कावळे किंवा इतर पक्ष्यांना पाहिल्या पहिल्या त्यांच्यावर हल्ला चढवून देतात आणि त्यांना पळवून लावतात. हे पक्षी देखील ‘फेडरल गार्ड सेवेचा’ एक भाग आहेत.

क्रेमलिन आणि आसपासच्या इमारतींचे रक्षण करणाऱ्या पक्ष्यांच्या टीम मध्ये ‘अल्फा’ नावाची एक २० वर्षीय मादी गरुड आणि तिची सहकारी ‘फाईल्या’ घुबड या शिकारी पक्ष्यांच्या गटामध्ये घाण पसरवणाऱ्या पक्षांवर हल्ला चढवतात. या दोघांना राष्ट्रपती भवनाभोवती एखादा कावळा फिरताना दिसला किंवा त्यांचा आवाज जरी आला तर तो आवाज ऐकताच त्या त्यांच्यावर तुटून पडतात, त्यांच्यावर हल्ला करतात किंवा त्यांना ठार करून टाकतात. हे शिकारी पक्षी सांभाळणाऱ्या टीमचा भाग असलेले अ‍ॅलेक्स वलासोव्ह म्हणतात की, हे पक्षी पाळण्यामागील हेतू फक्त इतर पक्षी किंवा कावळ्यांपासून मुक्ती मिळवणे नव्हे तर त्यांना इमारतींपासून दूर ठेवणे आहे जेणेकरून ते आपले घरटे तेथे भवनामध्ये बनवू नयेत किंवा इतर कोणतीही घाण करू नयेत.

राष्ट्रपती भवन क्रेमलिन व त्याच्या आसपासच्या सरकारी इमारतींचे निरीक्षण करणारे पाव्हेल मालकोव्ह म्हणतात की, सुरुवातीच्या सोव्हिएत युनियनमध्ये या इमारतींच्या संरक्षणासाठी काही रक्षक ठेवण्यात आले होते. आणि त्या सोबतच शिकार करणाऱ्या पक्ष्यांचे रेकॉर्ड केलेले आवाज देखील त्यांना घाबरवण्यासाठी वापरला जात होता. परंतु, यासर्व पद्धती अयशस्वी ठरल्या.

घुबड ‘फाइल्या’ला प्रशिक्षित करणारे डेनिस सिडोगिन म्हणतात, की घुबड हा रात्रीच्या शिकारीसाठी योग्य आहे. कारण, तो पूर्णपणे शांत राहून शिकार करतो. आणि तो एकटाच कावळ्यांशी स्पर्धा करण्यासाठी पुरेसा आहे. तो आपल्या मोठ्या डोळ्यांसोबतच आपली मानदेखील १८० च्या डिग्रीमध्ये फिरवू शकतो आणि बसल्या जागी तो मागेसुद्धा पाहू शकतो. एवढेच नव्हे तर या शिकारी पक्ष्यांना आता खास प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. जेणेकरून राष्ट्रपती भवनाच्या सभोवताल एखादा छोटा ड्रोन जरी दिसला तरी ते या ड्रोनला उध्वस्त करू शकतील.