‘या’ कॅन्टोन्मेंट हद्दीत वाहन प्रवेश शुल्क बंद ! संरक्षण मंत्रालयाचे कँटोन्मेंट बोर्डाना आदेश !

0
614

पुणे,दि.१०(पीसीबी) – पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटसह देशातील सर्व कँटोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क आकारणे थांबविण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कँटोन्मेंट बोर्डांना दिल्या आहेत.

संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक महासंचालक (कँटोन्मेंट) दमण सिंग यांनी याबाबतचे पत्र लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक कार्यालयाला पाठविले आहे. कँटोन्मेंट कायदा २००६ नुसार वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर कँटोन्मेंट बोडांकडून ‘एलबीटी’ सह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली.

लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून एकीरी वाहातुकीचे २० ते ७० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक वाहनांची या कराच्या कचाट्यातून सुटका झाली आहे. कॅंटोन्मेंट परिसरातील व्यापाऱ्यांना वाहन प्रवेश कर पासून एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.