‘यंदा गणेश मंडळांना महापालिकेने भाडे, परवानगी शुल्क व इतर भाडे माफ करा’

0
236

– शिवसेना निगडी विभागप्रमुख सतीश मरळ यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी दि.०१(पीसीबी) – कोरोनामुळे यंदाच्या वर्षीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर आर्थिक संकट कोसळले आहे. वर्गणी व देणग्यांचा ओघ आटला आहे. त्यामुळे महापालिकेचे भाडे, परवानगी शुल्क व इतर भाडे माफ करावे अशी मागणी शिवसेना निगडी विभाग प्रमुख सतीश मरळ यांनी केली आहे.

सतीश मरळ यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, हिंदु धर्मात गणेश उत्सवाची फार मोठी परंपरा आहे. प्रथमतः लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवांची सुरुवात केल्यापासुन आजतागत गणपती उत्सव छोटी-मोठी मंडळे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने हा सण साजरा करतात. यंदा कोरोनामुळे या उत्सव मंडळावर आर्थिक संकट कोसळले आहे. वर्गणी व देणग्यांचा ओघ आटला आहे.

मात्र उत्सव साजरा करायचाच असा निर्धार मंडळांचा आहे. छोटी-मोठी उत्सव मंडळे महापालिकेच्या मैदानात व इतरत्र परवानगी घेऊन मंडपाचे भाडे भरुन उत्सव साजरा करतात. मात्र यंदा कोरोनाच्या आर्थिक संकटामुळे मंडपाचे व इतर परवानग्यांचे भाडे भरणे या उत्सव मंडळाच्या आवाक्याबाहेर आहे.

यावर्षीच्या गणपती उत्सवासाठी सर्व छोट्या-मोठ्या उत्सव मंडळांकडून मंडप भाडे, परवानगी शुल्क व इतर कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, ते माफ करावे व हिंदुचा हा सण परंपरेनुसार यंदाही मोठ्या उत्साहात महाराष्ट्र शासनाच्या अटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या शर्तीनुसार साजरा करण्यास मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करावे अशी मागणी सतीश मरळ यांनी केली आहे.