यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी; आयुक्तांचे आवाहन

0
265

पिंपरी दि. १७ (पीसीबी)
– पालखी सोहळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेने सूक्ष्म नियोजन केले आहे. यंदाची वारी निर्मलवारी आणि प्लास्टिकमुक्त वारी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असून प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याकरिता आपत्कालीन नियंत्रणासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रुप कमांडर म्हणून नेमण्यात आले असून अंतरनिहाय पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील पालखी मुक्काम आणि मार्गावर त्यांच्या नियुक्त करण्यात आले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन अनुक्रमे 21 जून आणि 22 जून 2022 रोजी महापालिका कार्यक्षेत्रात होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी सोहळ्यासाठी महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य समन्वय आणि समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना पालखी सोहळा नियोजन आणि नियंत्रणासाठी मुख्य समन्वयक म्हणून नेमले आहे. तर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी उपायुक्त विठ्ठल जोशी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी उपायुक्त सचिन ढोले यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी कक्ष प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता थॅामस न-होना यांची तसेच नोडल ऑफिसर म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या ग्रुप कमांडर, अधिकारी आणि कर्मचा-यांवर पालखी सोहळ्यातील आपत्कालीन बाबींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी सोहळा ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन, विद्युत, पाणीपुरवठा, स्थापत्य तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी ग्रुप कमांडर टीमसोबत समन्वय राखून आपत्कालीन नियंत्रण कक्षाकरिता आवश्यकता असल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.

ग्रुप कमांडर हे आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख असणार आहेत. नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी ग्रुप कमांडर यांच्या नियंत्रणाखाली कामकाज पाहणार आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर निगडी भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डी चौक दरम्यान ‘ड’ क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड आणि कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ‘ए’ कार्यरत असणार आहे. आकुर्डी चौक ते चिंचवड चौक दरम्यान टीम क्र. ‘बी’ ही ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे आणि कार्यकारी अभियंता विलास देसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असेल. चिंचवड चौक ते पिंपरी चौक या ठिकाणी ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे आणि कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे टीम क्र. ‘सी’ मध्ये तर टीम क्र. ‘डी’ मध्ये ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी विनोद जळक व कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार असून ही टीम पिंपरी चौक ते संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन दरम्यान कामकाज पाहणार आहे. टीम ‘ई’ ही संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन ते कासारवाडी विसावा दरम्यान कार्यरत राहणार असून सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे आणि कार्यकारी अभियंता संजय घुबे या टीमला मार्गदर्शन करतील. ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात आणि कार्यकारी अभियंता यांच्या नियंत्रणाखाली कासारवाडी विसावा ते फुगेवाडी जकातनाका दरम्यान टीम ‘एफ’ कार्यरत राहणार आहे. फुगेवाडी जकात नाका ते दापोडी हॅरीस ब्रिज दरम्यान सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट आणि कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ‘जी’ कार्यरत राहणार आहे. टीम ‘एच’ ही मुक्कामाच्या ठिकाणी आकुर्डी येथील मंदिर येथे नियंत्रण कक्षाच्या ठिकाणी कामकाज पाहणार असून यामध्ये क्षेत्रीय अधिकारी अभिजित हराळे आणि कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांचे नियंत्रण या टीमवर असणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे आणि प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या मार्गदशनाखाली टीम ‘आय’ ही आळंदी रेस्ट हाउस समोर कार्यरत राहणार असून टीम ‘जे’ ही आळंदी रोडवरील थोरल्या पादुका विसावा मंदिर याठिकाणी कामकाज पाहणार आहे. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आणि कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांच्या नियंत्रणाखाली ही टीम कामकाज पाहणार आहे. मॅग्झीन चौक, भोसरी फाटा दरम्यान क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे आणि कार्यकारी अभियंता किशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ‘के’ तर दिघी गावठाण या ठिकाणी सहाय्यक आयुक्त दिलीप आढारी आणि कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे यांच्या नियंत्रणाखाली टीम ‘एल’ कामकाज पाहणार आहे. पालखी सोहळा ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणार आहे त्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकातील अधिकारी, कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांचा या कामात आवश्यकतेनुसार समावेश करण्यात येणार आहे.