‘… म्हणून ‘वापस जाओ, वापस जाओ’ म्हणत भाजप नेते सोमय्यांना हॉस्पिटलबाहेरूनचे पळवून लावले

0
327

ठाणे, दि.२८ (पीसीबी) : राज्यात कोरोनाचे संकट ओढावले आहे. लोकांना लवकर बेड आणि औषध मिळत नाही. अशा परिस्थितीत राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रकार घडत आहे. लोकांमध्ये याबद्दल प्रचंड नाराजी पाहण्यास मिळत आहे. याचाच फटका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना बसला. ‘वापस जाओ, वापस जाओ’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि स्थानिक लोकांनी सोमय्यांना पिटाळून लावले आहे.

महाविकास आघाडी सरकारवर आरोप टीकेची एकही संधी न सोडणारे किरीट सोमय्या यांना आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि मुंब्य्रातील स्थानिक लोकांचा सामना करावा लागला. ठाण्यातील मुंब्रा कौसा येथील प्राईम रुग्णालयात दुर्घटनेनंतर घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ठाकरे सरकारच्या काळात कोविड हत्याकांड सुरू आहे, असा आरोप केला. त्यानंतर तिथेच उपस्थितीत असलेले राष्ट्रवादीचे नेते अश्रफ शानू पठाण यांनी आक्षेप घेतला आणि सोमय्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. आम्ही इथं लोकांना मदत करण्यासाठी आलो आहे आणि मदत करण्याचे सोडून आरोप कसले करता. राजकारण करण्याची ही वेळ आणि जागा नाही. जर तुम्हाला टीका करण्याची इतकीच हिंमत असेल तर केंद्र सरकारवर बोलून दाखवा, त्यांनाही काही जाब विचारा, अशा शब्दांत पठाण यांनी सोमय्यांना सुनावले.

तसंच, ज्यावेळी इथं दुर्घटना घडली तेव्हा मदत करण्यासाठी का आला नाही, रात्री रुग्णालयाला आग लागली होती, आम्ही लोकं इथं रुग्णांना बाहेर काढत होतो, त्यावेळी तुम्ही कुठे होता? उगाच इथं येऊन कुणावरही टीका टिप्पणी करू नका, महाराष्ट्रावर टीका करत असताना जरा स्वत: च्या अंतर्मनातही बघा, केंद्र सरकारला जाब विचारून दाखवा, असा टोलाही लगावला. त्यानंतर स्थानिक लोकांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘वापस जाओ जाओ किरीट सोमय्या वापस जाओ’ अशी घोषणाबाजी केल्यामुळे किरीट सोमय्यांना आल्या पावली मागे फिरावे लागले.