…म्हणून मोदींचे पर्रिकरांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचे धाडस नाही   

0
1780

पणजी, दि. २२ (पीसीबी) – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे राफेल विमान  खरेदी कराराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचे धाडस दाखवत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते जयपाल रेड्डी यांनी केला आहे.

एका कार्यक्रमात बोलताना रेड्डी म्हणाले की, भाजपकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जातात. मात्र,  पर्रिकरांच्यावेळी भाजपची ही नैतिकता कुठे जाते? पर्रिकर हे एखाद्या जळवेसारखे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसले आहेत.

फ्रान्सबरोबर राफेल करार  करताना  मनोहर पर्रिकर यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्याकडे या कराराबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आहे. याचीच भीती दाखवून पर्रिकर आपले मुख्यमंत्रीपद सुरक्षित ठेवत आहेत. यामुळेच मोदी त्यांना काहीही करु शकत नाहीत, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पर्रिकर गेल्या काही महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त आहेत. यामुळे त्यांची प्रकृती कमालीची ढासळली आहे. मात्र,  तरीही भाजप  त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्यास तायर नाही.   गंभीर आजारी  असतानाही  पर्रिकर यांनी काही दिवसापूर्वी  विकास कामांची पाहणी केली होती.