‘म्युकर मायकोसिसचा धोका रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा’- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

0
182

– उपचारास विलंब, औषधांच्या तुटवड्याबाबत खबरदारी घ्यावी

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – कोरोना‌ महामारीसोबत म्युकर मायकोसिसचा धोका वाढत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना या आजाराचा अधिक धोका असून हा आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि यंत्रणा कार्यन्वित करावी. उपचारासाठी विलंब आणि औषधांचा तुटवडा निर्माण होणार नाही. यासाठी महापालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करावे, अशी मागणी राष्ट्वादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे‌. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो.‌ म्युकरमायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनामुक्त झाल्यानंतर होणाऱ्या या आजारात ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसचा संसर्ग धोकादायक आहे. हे फंगस रुग्णाच्या अवयवावर हल्ला करतात. यात शस्त्रक्रिया आणि उपचार करून रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची अधिक काळजी घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली आहे. हा आजार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आणि कोरोनामुक्त रुग्णांवर लक्ष देणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिका वैद्यकीय विभागाने अशा रुग्णांना तातडीने उपचार मिळतील. यासाठी या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची चाचणी व त्यांना वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था तातडीने करावी.

याबरोबरच महानगरपालिका रुग्णालयांमध्ये या आजारांवर शस्त्रक्रिया व‌ उपचारासाठी लागणारे आवश्यक डॉक्टर, मेडिकल स्टाफ आणि यंत्रणा तातडीने उभी करावी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रेमडेसिवीर औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ही परस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. याची दक्षता महानगरपालिकेने घ्यावी. म्युकर मायकोसोसिस आणि त्यामुळे होणारे‌ ब्लॅक व व्हाईट फंगस याच्या उपचारासाठी लागणारी औषधे तातडीने उपलब्ध करावेत, अशी मागणी संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

-औषधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय ठेवा
म्युकर मायकोसोसिस आजारासाठी लागणारी औषधे ‌जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नियंत्रित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्या औषधांचे वितरण होत आहे. त्यासाठी ‌‌‌‌जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सतत संपर्कात राहून योग्य समन्वय ठेवावा. आवश्यक पुरवठा वेळेवर होईल आणि शहरात त्याची कमतरता भासणार नाही. याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, असंही संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.