मोशी-आळंदी रस्त्यावर एकाचा गळा आवाळून खून

0
644

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – एका ४२ वर्षीय इसमाचा गळा आवळून खून करण्यात आला. तसेच त्याला मोशी-आळंदी रस्त्यावरील श्रीनाथ कन्स्ट्रक्शन समोरील हवालदारवस्ती येथे टाकूण देण्यात आले. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास समोर आली.

ईश्वर सोमनाथ बदनाळे (वय ४२, रा. राजु सस्ते यांची चाळ, शिवाजीवाडी, मोशी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सुजित दत्तात्रय सस्ते (वय ४१, रा. शिवाजीवाडी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मोशी-आळंदी रस्त्यावरील श्रीनाथ कन्स्ट्रक्शन साईटवर ईश्वर यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्राथमिक तपास करुन ईश्वर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालात ईश्वर यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ईश्वर ज्या घरात भाड्याने राहत होते. त्याचे मालक सुजित सस्ते यांनी  भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.