मोबाईल चोरणारे दोन सराईत गजाआड, ११० मोबाईल जप्त; चिंचवड पोलिसांची कारवाई  

0
1554

चिंचवड, दि. २० (पीसीबी) – चिंचवड, पिंपरी, आकुर्डी, निगडी या परिसरात मोटारसायकलवरून येऊन चालत जाणाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई चिंचवड, बिजलीनगर येथे करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख ६२ हजार रुपये किंमतीचे ११० मोबाईल, ९० हजार रूपयांची २२० बजाज पल्सर मोटारसायकल, ६० हजार रूपयांची होंडा डिओ मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली आहे.

लखन ऊर्फ बबल्या अवधूत शर्मा (वय१८, रा. दळवीनगर, झोपडपट्टी,चिंचवड), लहू ऊर्फ लाल्या अंकुश भिसे (वय १८, रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) अशी अटक केलेल्या सराईतांची नांवे आहेत. तर एका अल्पवयीन चोरट्याला बालसुधारगृहात दाखल केले आहे. तर याप्रकरणात सराईतांना मदत केल्याप्रकरणी बबल्या शर्मा यांची आई मंगल अवधूत शर्मा हिला सह आरोपी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे मोबाईल चोरटे दळवीनगर, पांढरकर चाळ येथे मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस शिपाई गोविंद डोके यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, हवालदार पांडुरंग जगताप, राजेंद्र शिरसाट, स्वप्निल शेलार, विजयकुमार आखाडे, पंकज भदाणे, राहुल मिसाळ, अमोल माने यांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी या परिसरातून ११० मोबाईल चोरल्याची कबुली दिली.