मोठी बातमी: मुळशीतील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये बॉम्ब स्फोट

0
732

मुळशी, दि. ५ (पीसीबी) – पौड येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्त करुन ठेवले होते. या बॉम्बचा बुधवारी (दि.५) पहाटे चार ते पाचच्या दरम्‍यान जबरदस्त स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र यामध्ये वनपरिक्षेत्र कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौड येथील बारमुख यांच्‍या इमारतीत ताम्हिणी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालय आहे. ताम्हिणी अभयारण्‍य परिसराचे कामकाज येथुन चालते. काही दिवसांपुर्वी मुळशी परिसरातील जंगलांतुन शिकाऱ्यांनी रानडुक्कर इत्यादी प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन या कार्यालयात ठेवले होते. बुधवारी पहाटेच्‍या सुमारास जप्‍त करुन ठेवलेल्‍या या गावठी बॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की कार्यालयाचे दरवाजे, खिडक्‍या तुटून पडले. तसेच इमारतीला तडे गेले कार्यालयातील सामानाचे तुकडे झाले. वनपरिक्षेत्राचे हे कार्यालय नागरी वस्‍तीत आहे. मात्र पहाटेच्या वेळेत हा स्फोट झाल्याने तसेच कार्यालय बंद असल्याने कुठलीही जिवीत हानी झाली नाही. पौड पोलिस अधिक तपास करत आहेत.