मुख्यमंत्र्यांचा वसंत मोरेंना फोन… शिवसेनेची ‘ऑफर’

0
363

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांविरोधात पुकारलेल्या भूमिकेबद्दल पक्षांतर्गत काही जणांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये पुण्याचे मनसे शहरप्रमुख वसंत मोरे आघाडीवर होते. रमजान सुरू असल्याने मुस्लीम बांधवांविरोधात कोणतंही पाऊल उचलणार नाही, असं मोरे म्हणाले. यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. शहराध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. यानंतर साईनाथ बाबर यांच्याकडे पुण्याची सूत्र देण्यात आली आहेत.

मोरे यांनी आपल्या पक्षात यावं यासाठी अनेक पक्षांचे नेते त्यांच्या संपर्कात असल्याचं खुद्द मोरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता वसंत मोरेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याचं समोर आलंय. याआधी पुण्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही मनसेतील नाराज नेते आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षात यावं, असं म्हटलं होतं.

गुढीपाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलंय. पुण्यात याआधी तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत खदखदही सुरू आहे.

वसंत मोरे यांची हकालपट्टी झाल्यापासून ते कोणत्या पक्षात जाणार, याची चर्चा सुरू होती. त्यांनी सर्व पक्षांतील बड्या नेत्यांचे फोन आल्याचं खुद्द मोरेंनींच सांगितलं होतं. पुण्यात मनपा निवडणुकीआधी हे नाराजीनाट्य रंगल्याने मनसेला मोठा फटका बसणार असल्याचं चित्र आहे.