मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुट्टीवर

0
442

महाबळेश्वर, दि.३१ (पीसीबी) – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आजपासून तीन दिवसांसाठी सहकुटुंब महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. राज्याच्या कारभाराची धुरा हाती घेतल्या नंतर प्रथमच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे महाबळेश्वरला येत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून महाबळेश्वरला येण्याची परंपरा यानिमित्ताने जपली जाणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वर दौऱ्यावर असल्याने प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून पोलीस प्रशासन, पालिका, महसूल, बांधकाम विभागासह सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे. तसेच सुरक्षेसाठी जिल्हयाचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर एक महत्वाची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री महाबळेश्वर मुक्कामी असून राजभवन या शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम असणार आहे. वेण्णालेक पठारावर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने प्रशासनानेही तयारी केली आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या अपेक्षा जाणून प्रश्नांवर मार्ग काढण्याची भूमिका मुख्यमंत्री म्हणून येणारे ठाकरे घेतील, अशी आशा आहे.

तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध विभागाचे उच्चस्तरीय अधिकारी आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी याठिकाणी दाखल झालेत. आ. भास्कर जाधव यांच्या मुलीचा विवाह सभारंभ महाबळेश्वर येथील कीज रिसॉर्टमध्ये १ फेब्रुवारीला रोजी होणार आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.