मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर अनिल कपूर म्हणतो..

0
480

मुंबई, दि.३१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटला तरी राज्यातील सत्तास्थापनाच्या वाटाघाटी मात्र अद्यापही पूर्ण होताना दिसत नाही. भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या मुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांवरून वाद सुरू आहेत. शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणीही करण्यात येत आहे. अशातच सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या कल्पकतेला उधाण आले आहे. जोपर्यंत हे दोन पक्ष मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेणार, तोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूरची नियुक्ती करा, असे नेटकऱ्यांनी म्हटलंय. यामागचे कारण म्हणजे अनिल कपूर ‘नायक’ या चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झाला होता.

२००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘नायक’ या चित्रपटात अनिल कपूर एका कॅमेरामनच्या भूमिकेत असतो. पण मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतल्यानंतर त्याला एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. त्या एका दिवसात तो समाजात बदल घडवणारी बरीच कामं करतो. त्यामुळे महाराष्ट्रात जोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांना मुख्यमंत्री बनवून पाहुयात, से नेटकऱ्यांनी म्हटलंय.

 विशेष म्हणजे, नेटकऱ्यांच्या या मागणीवर अनिल कपूर यांनी उत्तर दिले आहे. ‘मै नायक हीं ठीक हूँ’, म्हणत अनिल कपूरने अभिनेता म्हणूनच आनंदी असल्याचं म्हटलंय. अनिल कपूर यांच्या या उत्तराचंही अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींनी ‘नायक’च्या सिक्वलची इच्छा व्यक्त केली आहे.