मुकेश अंबानी यांनी गमावले २० हजार कोटी, अदानींनी कमावले २ लाख कोटी, गौतम अदानी होणार सर्वात श्रीमंत भारतीय?

0
384

नवी दिल्ली, दि १ (पीसिबी) : सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आणि देशातील टॉप ५ श्रीमंतांपैकी एक असलेले गौतम अदानी यांच्या संपत्तीत फारसे अंतर राहिलेले नाही. २०२१ मध्ये ज्या पद्धतीने गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे, ते पाहून सर्वात श्रीमंत आशियाई व्यक्तीचा किताब मुकेश अंबानी यांच्याकडून गौतम अदानी हिरावून घेऊ शकतात का? हा प्रश्न चर्चेत आला आहे. तर दुसऱ्या बाजूस मुकेश अंबानी यांची संपत्ती मात्र तितक्या वेगाने वाढत नसल्याचे चित्र आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सवर असलेल्या माहितीनुसार गौतम अदानी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अंबानी यांच्यापेक्षा फक्त १२ अब्ज डॉलरने मागे आहेत.

मुकेश अंबानी हे सध्या जगातील १३व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७४.१० अब्ज डॉलर इतकी आहे. २०२१ मध्ये अंबानी यांच्या संपत्तीत २.६२ अब्ज डॉलरची (जवळपास २० हजारी कोटी रुपये) घसरण झाली आहे. तर ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये गौतम अदानी १९व्या क्रमांकावर आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती ६२.७० अब्ज डॉलर इतकी आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत एकूण २९ अब्ज डॉलरची (जवळपास २ लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. २०२१ मध्ये संपत्तीत वाढ होण्याच्या बाबतीत गौतम अदानी जगात दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

२०२१मध्ये संपत्तीत वाढ होण्याच्या बाबतीत गौतम अदानी यांनी जेफ बेझॉस, इलॉन मस्क, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफे, बिल गेट्स यांच्यासारख्या अब्जाधीशांनी मागे टाकले आहे. २०२१ अदानी यांच्यापेक्षा फक्त फ्रान्सचे अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांनीच जास्त वाढ नोंदवली आहे. बर्नाड अर्नाल्ट यांच्या संपत्तीत ४२.३० अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

बिझनेस इनसायडरमधील अहवालानुसार २०२० मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत तब्बल ५०० टक्क्यांची वाढ झाली आहे. गौतम अदानी सध्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते अदानी समूहाचे चेअरमन आहेत. अदानी समूहाच्या सहा कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. या सर्व सहा कंपन्यांनी कोरोनाच्या संकटकाळात जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. या सहा कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ८० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे.

एका अहवालानुसार ऑक्टोबर २०२०पासून आतापर्यत अदानी पोर्टच्या शेअरच्या किंमतीमध्ये ११८ टक्के, अदानी एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीमध्ये ३२३ टक्के, अदानी गॅसच्या शेअरच्या किंमतीमध्ये ५८५ टक्के, अदानी पॉवरच्या शेअरच्या किंमतीमध्ये १६० टक्के, अदानी ट्रान्समिशनच्या शेअरच्या किंमतीमध्ये ३७७ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत ४७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

अदानी समूह पायाभूत सुविधांचे क्षेत्र, बंदर, विमानतळ, खाणउद्योग, अपारंपारिक ऊर्जा, वीज वितरण, गॅस अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. मागील काही वर्षांपासून अदानी समूहाच्या कंपन्यांनी दमदार कामगिरी केली आहे. अदानी समूहाने अनेक कंपन्यांचे अधिग्रहणसुद्धा केले आहे. आगामी काळात मोठ्या विस्ताराच्या योजना अदानी समूह आखत आहे.