मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेसेवा १५ ऑगस्टनंतरच पूर्ववत

0
702

मुंबई, दि.१२ (पीसीबी) – मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही रुळावर आलेली नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा पट्टय़ात दरड कोसळून मोठे नुकसान झाले. त्यामुळे हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी वेळ लागत असून १५ ऑगस्टनंतरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडल्या होत्या. त्यामुळे या स्थानकांदरम्यान २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामे करण्यासाठी नियोजन केले; परंतु २ ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत ते लोणावळा भागांत तीन ठिकाणी दरड कोसळणे, पाणी साचून मोठा फटका बसला आणि ३ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंदच ठेवावा लागला.

गेल्या दहा महिन्यांत याच भागांत १,८०० मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडला आहे व सातत्याने अधूनमधूनही पाऊस पडतच आहे. त्यामुळे दरड बाजूला करून येथे विविध प्रकारची कामे केली जात आहेत.

कर्जत ते लोणावळा भागांत २०० ते २५० कर्मचारी रुळदुरुस्ती तसेच दरड कोसळलेल्या भागांत विविध कामे करीत आहेत. येथील नागनाथ भागांत दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. सातत्याने पडत असलेला पाऊस यामुळे कामांत अडथळा येत असून मुंबई ते पुणे रेल्वे सेवा १६ ऑगस्टपासून पूर्ववत करण्याचे प्रयत्न असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

पश्चिम व मध्य रेल्वे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी शनिवारी कर्जत ते लोणावळा भागांतील कामांची माहिती घेतली. त्यानंतर रेल्वे मंडळ आणि रेल्वेच्या रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनच्या अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली.

मुंबई ते पुणे मार्गावर रेल्वे सेवा बंद असली तरी त्यापुढे कोल्हापूपर्यंत जाण्यासाठी दौंड, मनमाडमार्गे गाडय़ा वळवण्यात येत होत्या; परंतु सांगली, कोल्हापूरला आलेल्या महापुरामुळे या गाडय़ांनाही मोठा फटका बसल्याने बऱ्याच गाडय़ा रद्द करण्यात आल्या.