महापुरात ४० नागरिकांचा मृत्यू, दोन बेपत्ता – विभागीय आयुक्त

0
777

पुणे, दि. ११ (पीसीबी) –  कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात  अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत  ४० जणांचा  बळी गेला आहे. तर दोन जण बेपत्ता आहेत,  अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी  आज (रविवार) पत्रकार परिषद दिली.

पुरामुळे सांगलीत १९, कोल्हापुरात ६, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी ७ आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.  तर सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात प्रत्येकी एक असे तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये आज ५ मृतदेह सापडल्याचे   म्हैसेकर यांनी सांगितले.

कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ नागरिकांचे  स्थलांतर करण्यात आले आहे.  सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी ५६ फुटावरून ५३ फुटावर आली आहे.

सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार  आहे.  पूरग्रस्त कुटुंबांना रक्कम देताना बँकेकडून चेक किंवा बँक पासबुक मागण्यात येणार नाही. केवळ बँकेतील स्लीपवरून पैसे मिळणार आहेत.  आधार कार्डवरून ओळख पटवली जाईल. एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास संबंधित पूरग्रस्त कुटुंबात या ओळखीच्या व्यक्तीचे आधार कार्ड पाहून रक्कम दिली जाणार  आहे, असे म्हैसकर यांनी सांगितले.