मुंबई, ठाणे, नाशिकमधून मनसे लोकसभेच्या ५ जागा लढवणार   

0
1730

मुंबई, दि. १ (पीसीबी) –  आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेच्या मोजक्‍याच जागा लढवणार असल्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पक्षाचे अस्तित्व राहण्यासाठी काही मोजक्‍या जागा लढवण्यात याव्यात,  असे मत मनसेच्या अनेक नेत्यांनी  यावेळी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. मुंबई, ठाणे, आणि नाशिक  या शहरात  मनसेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात  २ ते ५ जागा पक्षाने लढवाव्यात, असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

त्याचबरोबर मनसेचे उमेदवार नसलेल्या ठिकाणी मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला एकतर्फी पाठिंबा द्यावा, असे काही नेत्यांनी मत मांडल्याचे समजते. यावर राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर दुसरीकडे मनसे काँग्रेस आघाडीत सामील  होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.