मुंबईत 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पत्नी-मुलं घरात नसताना गळफास..

0
301

मुंबई, दि. 24 (पीसीबी): 40 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. अंधेरी भागात राहणाऱ्या सुरेश चव्हाण यांनी पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. चव्हाणांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.सुरेश चव्हाण हे ठाण्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. रविवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची पत्नी दोन मुलांसह भावाकडे गेली होती. रात्री उशिरा तिघं घरी आले, तेव्हा दरवाजा वाजवूनही बराच वेळ आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या पत्नीने दरवाजा तोडला, तेव्हा सुरेश चव्हाण हे खोलीतील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडले.

सुरेश चव्हाण यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत या प्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.
घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश चव्हाण यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही समजलेलं नाही.दुसरीकडे, मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दूरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. प्रद्युम्न मयुरेश चेंडके (वय 19 वर्ष) असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे. घरची मंडळी झोपल्यानंतर राहत्या घरातच त्याने आयुष्याची अखेर केली. नागपूर एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सूतगिरणी (वाघधरा) परिसरात ही घटना उघडकीस आली.
प्रद्युमनने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र चेंडके कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रद्युम्नच्या बहिणी शोकसागरात बुडाल्या आहेत. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.