मुंबईचे पोलिस आयुक्त बदलण्याची शक्यता ? त्याजागी ‘यांची’ होऊ शकते नियुक्ती

0
284

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – अंबानींच्या घराजवळ स्फोटके नेवून ठेवण्याचा प्रयत्न सचिन वाझे यांच्या निलंबनापर्यंत थांबणार की या प्रकरणासाठी उच्चपदस्थांना जबाबदार धरले जाणार असा प्रश्न चर्चेला आला असून मुंबई पोलिसआयुक्त परमवीरसिंग यांचीही उचलबांगडी होणार याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत. दरम्यान याच विषयावर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेली बैठक नुकतीच संपली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे , अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते.

अँटेलियाबाहेर स्फोटकांची गाडी ठेवण्याच्या प्रकरणात NIAने सचिन वाझे यांना अटक केली आहे. त्यांच्या जबानीतून काय बाहेर येते याकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्फोटके नेवून ठेवणे ,त्या साठी वापरल्या गेलेल्या गाडीच्या तथाकथित मालकाची हत्या होणे हा गंभीर प्रकार आहे असे प्रशासनातील काही महत्वाच्या व्यक्तींचे मत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीतही या संबंधात चर्चा झाली आहे, असे अधिकारी वर्तुळात बोलले जात होते.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदलले जाईल, अशीही चर्चा होती. मात्र, सध्या जोरदार चर्चा आहे ती मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या बदलीची. रजनीश सेठ, ठाण्याचे आयुक्त विवेक फणसळकर आणि सेवाज्येष्ठतेत क्रमांक एकवर असलेल्या संजय पांडे यांच्या नावांचा आयुक्तपदावरील नियुक्तीसाठी विचार सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यात रजनीश सेठ यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी वर्णी लागेल, असेही बोलले जात आहे.