माहिती अधिकार कट्टा बैठक, गुरुवारी झूम ॲप द्वारे

0
243

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) सामान्य नागरिकांना माहिती अधिकार कायद्याची व्यवस्थित माहिती व्हावी. या कायद्यांतर्गत माहिती मागताना येणाऱ्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन मिळावे या हेतूने माहिती अधिकार कट्टा सुरू करण्यात आला. कोरोनामुळे बैठकांना अडचण येत असल्याने आता झूम ॲप द्वारे येताय गुरावारी (दि.७) ही बैठक होईल असे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कळविले आहे.

माहिती अधिकार कट्ट्यावर लोक एकत्र येऊन माहिती अधिकार विषयक प्रश्नांवर चर्चा करतात. आजपर्यंत शेकडो नागरिकांनी माहिती अधिकार कट्ट्याचा लाभ घेतला.मात्र कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावामुळे मागील सात वर्षे सुरू असणारा कट्टा अचानकपणे थांबवावा लागला.परंतु त्यामुळे माहिती अधिकार वापरणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ऑनलाइन माहिती अधिकार कट्टा सुरू करण्याची कल्पना मनात आली. मागील आठवड्यापासून त्याला सुरुवात ही झाली.मागील आठवड्यात झालेल्या कट्ट्यावर अनेक विषय चर्चिले गेले. ३० एप्रिल २०२० रोजी पार पडलेल्या पहिल्या ऑनलाईन माहिती अधिकार कट्ट्यावर माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी उपस्थिती लावली होती.

या आठवड्यातील कट्टा गुरुवारी (दि.७) सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत होणार आहे. माहिती अधिकार कट्ट्यावर उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. कुंभार यांनी केले आहे. झूम् ॲप द्वारे हा कट्टा पार पडेल. या कट्ट्यावर कसं सामील व्हायचं याची माहिती वेगळ्या ई-मेलद्वारे सर्वांना सांगितली जाईल असे कुंभार यांनी म्हटले आहे.