मास्क घातला नाहीत तर 200 रुपये दंड, महापालिका स्थायी समितीचा निर्णय

0
295

पिंपरी, दि.4 (पीसीबी) : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 500 रुपये दंड ठरवून कारवाई सुरू केली होती. अनेकांकडून 500 रुपये प्रमाणे दंडही वसूल केला आहे. परंतु, दंडाची रक्कम जास्त असल्याने स्थायी समितीने आज (दि.3) दंडाची रक्कम कमी करून 200 रुपये केली आहे. त्यामुळे आता मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मास्क वापरण्याचे 8 एप्रिल रोजीच्या आदेशाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करत नसल्याचे आढळून आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सामाजिक अंतर पाळण्याबरोबरच मास्क परिधान करणे क्रमप्राप्त आहे.
सर्व नागरिकांनी सक्तीने त्याचे पालन करणे आवश्यक आहे. शहरातील नागरिक मास्कचा वापर करत नसल्याने महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालयांसह इतर सर्व परिसरात वावराताना मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई करत 500 रुपये दंड वसूल केला जात होता.
परंतु, दंडाची रक्कम जास्त आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना रोजगार नाही. घराबाहेर पडल्यावर मास्क खराब झाला. तर, 500 रुपये दंड भरणे अशक्य आहे. त्यामुळे 500 रुपयांऐवजी 200 रुपये दंडाची आकारणी करावी, अशी उपसूचना स्थायी समिती सभेत मंजूर केली आहे.