मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0
327

मोशी, दि. ९ (पीसीबी) – कंपनीच्या प्लांटमध्ये येऊन दोघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 7) दुपारी साडेपाच वाजताच्या सुमारास मोशी येथे घडली.

प्रशांत रामकिसन खळगे (वय 38, रा. दत्तनगर पोलीस चौकी शेजारी, दिघी) यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैभव चिट्टे आणि अन्य एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी साडे पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी मोशी येथील मोहनलाल मथराणी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्लांटमध्ये थांबले होते. त्यावेळी आरोपी आपसात संगणमत करून कंपनीच्या प्लांटमध्ये आले. आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा प्रज्वल याला शिवीगाळ करून हाताने व लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांचा मुलगा जखमी झाला. त्यानंतर फिर्यादी यांच्या कंपनीत काम करणारा कामगार अब्दुल पठाण याला देखील आरोपींनी लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.