माढ्यातून शरद पवारांच्याविरोधात वॉटर किसान आर्मीचे प्रफुल्ल कदम मैदानात

0
736

पंढरपूर, दि. ११ (पीसीबी) – पाणी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल कदम माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. पंढरपुरातील वाटंबरे येथे झालेल्या मेळाव्यात  कदम यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  माढ्यातून  रिंगणात उतरले आहेत.  

वॉटर किसान आर्मीचे संस्थापक असलेले प्रफुल्ल कदम यांनी टाटाच्या धरणातील पाणी शेतीला देण्याबाबत लढा उभा केला होता. त्यांनी आता माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. वाटंबरे येथे आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये शेतकरी आणि तरुण वर्गाने त्यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा दर्शवला आहे.

आपण जनतेच्या निधीवर आणि पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवणार आहे,  असे  कदम यांनी सांगून माढा मतदारसंघातील ८६० गावाशी पाणी चळवळीमुळे आपला थेट संबंध  आहे. ही जनताच आता या मतदारसंघात इतिहास घडवेल, असा विश्वास प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही, असेही ते म्हणाले.