माढ्यातून शरद पवारांचा डमी अर्ज?; भाजपच्या सुभाष देशमुखांना तयारीच्या सुचना  

0
1215

सोलापूर, दि. ३ (पीसीबी) – माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून संजय शिंदे   आपला उमेदवारी  अर्ज आज (बुधवार) दाखल करणार आहेत.  तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा डमी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भाजपने देखील  सावधानता म्हणून  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाही  अर्ज  दाखल करण्याच्या सुचना केल्या आहेत. 

माढा लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु मुरब्बी राजकारणी अशी ओळख असलेले पवार ऐनवेळी कोणता डाव टाकतील याचा नेम नाही,  त्यामुळे भाजपनेही सावध खेळी केली असून देशमुख यांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान,  शिंदे यांचा डमी अर्ज भरण्याची  शंका  भाजपला आल्याने भाजपने देखील खबरदारीचा उपाय म्हणून सुभाष देशमुख यांना  सावध राहण्याच्या सुचना केल्या आहेत.  याबाबत देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आपण डमी अर्ज भरणार आहे,  असे सांगितले.