माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे कोरोना मुळे निधन

0
407

नवी दिल्ली, दि.31(पीसीबी) : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (वय-८४) यांची वैद्यकीय प्रकृती रविवारपासून खालावली  होती आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. एक अत्यंत सभ्य, शालीन, सुसंस्कत राजकारणी अशी त्यांची ख्याती होती.  इंदिरा गांधी यांच्या काळापासून केंद्रीय मंत्रीमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. राजीव गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदासठी त्यांचे नाव घेतले जात होते. अखेर च्या टप्प्यात राष्ट्रपती पदासाठी त्यांना संधी मिळाली. त्यांच्या निधनावर देशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पाच वेळा राज्यसभेचे तर दोन वेळा लोकसभेचे सदस्य होते. २०१२ मध्ये देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून ते निवडून आले होते. मोदी सरकारच्या काळात भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना जन्म 11 डिसेंबर 1935 ला पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील किरनाहरजवळील मिराती गावात झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाम कामदा किंकर मुखर्जी आणि आईचं नाव राजलक्ष्मी मुखर्जी. सूरी विद्यासागर कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले होते. हिस्ट्री आणि पॉलिटिक्समध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी लॉ ची पदवी प्राप्त केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर बांग्ला प्रकाशन संस्थेच्या देशेर डाकसाठी काही काळ पत्रकारिताही केली. बंगिय साहित्य परिषदेचे ट्रस्टी आणि अखिल भारत बंग साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष पदही त्यांनी भूषवले आहे.

आज सकाळी बुलेटिनमध्ये सांगितले होते की,  मुखर्जी त्याच्या फुफ्फुसातील संसर्गामुळे सेप्टिक शॉकमध्ये आहेत. सकाळ पासून त्यांची प्रकृती खालावली होती. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यासाठी अथक प्रयत्न केले. दिल्ली रुग्णालयात दाखल असलेल्या आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर) येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, ते डिप कोमामध्ये असून व्हेंटिलेटरच्या मदतीवर होेते.मुखर्जी दिल्लीत राजाजी मार्गावरील निवासस्थानी खाली पडल्याने त्यांच्या मेंदूतला गोठण दूर करण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी 10 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर त्याना फुफ्फुसाचा संसर्ग झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राष्ट्पती, पंतप्रधान यांची आदरांजली 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर त्यांनी छाप सोडली आहे. एक विद्वान, एक राजकारणी त्यांचे समाजातील सर्व घटकांनी कौतुक केले.