माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन

0
654

नवी दिल्ली, दि.७ (पीसीबी) – भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले.  त्या ६६ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे देहावसान झाले.

त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

भाजपच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. प्रकृतीच्या कारणावरून २०१९ची लोकसभा निवडणूक आपण लढवणार नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले होते. काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे त्यांचे ट्वीट अखेरचे ठरले. त्यात त्यांनी ‘मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते,’ असे नमूद केले होते.

सुषमा स्वराज यांना रुग्णालयात दाखल करताच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापाठोपाठ भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली.

‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतीय राजकारणातली ‘सुपरमॉम’ असा त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. समाजमाध्यमावर अत्यंत सक्रीय आणि मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या स्वराज यांनी परदेशात मदतीसाठी अडकलेल्या अनेक नागरिकांना केवळ एका ट्वीटवरून परराष्ट्रमंत्री या नात्याने मदत केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही त्या अत्यंत लोकप्रिय होत्या.