माघारीच्या निर्णयाचे खेळाडूंकडून स्वागत

0
194

पॅरिस, दि.०१ (पीसीबी) : पत्रकारांशी संवाद न साधण्याच्या निर्णयावरून नाओमी ओसाका हिने फ्रेंच ओपन स्पर्धेत कारवाई होण्यापूर्वीच माघार घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या या तडकाफडकी निर्णयानंतर टेनिस विश्वातून तिला पूर्ण पाठिंबा मिळत आहे. ओसाकाने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे ट्विट अनेक आजी माजी खेळाडूंनी केले आहे. मार्टिना नवरातिलोवा या टेनिस सम्राज्ञीसह सध्याची क्वीन सेरेना विल्यम्स यांनी यात सर्व प्रथम उडी घेतली आहे.

पत्रकारांशी बोलणार नाही हा ओसाकाची निर्णय आयोजकांना रुचला नाही. त्यांनी तिला १५ हजार डॉलरचा दंड केला आणि पुढेही असाच बहिष्कार कायम ठेवल्यास तिला स्पर्धेतून वगळले जाण्याचा इशारा देखिल दिला. झाले तेवढे पुरे झाले. आणखी वाद नको. आपल्या निर्णयावर ठाम राहताना ओसाकाने मानसिक अस्वास्थाचे कारण देत स्पर्धेतूनच माघार घेतली.

ओसाकाच्या या निर्णयाला सर्वात प्रथम मार्टिना नवरातिलोवा यांनी पाठिंबा दिला. त्या म्हणाल्या, ‘ओसाकाबद्दल मला वाईट वाटते. ती ठिक असावी अशी आशा करुयात. एक खेळाडू म्हणून आपल्याला शारीरिक काळजी घेण्याचे शिकवले जाते. पण, मनाचे काय. शरीराची काळजी घेता घेता आपण मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खचून जातो. तिचा हा प्रश्न फक्त पत्रकार परिषदेपुरता मर्यादित नाही. याचा विचार करायला हवा होता.’

पत्रकार परिषदेस जायचे किंवा जायचे नाही या पेक्षा तु असणे हे सर्वात महत्वाचे आहे. तुला शुभेच्छा, आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत, असेही मार्टिना म्हणाल्या. सेरेना विल्यम्सनेही या स्पर्धेत दुसरी फेरी गाठली. पहिल्या फेरीच्या विजयानंतर तिने सुरवातीलाच आपल्याला ओसाकाविषयी सहानुभूती आहे. जे झाले ते वाईट आहे. माझा पूर्ण पाठिंबा तिला आहे. कारण, अशा वेळी काय मानसिक स्थिती असते हे मी जाणते, असे सेरेना म्हणाली. ओसाकाची बाजू घेत तिने प्रत्येक व्यक्ती सारखी नसते. आयुष्यात अनेक वेगवेगळ प्रवृत्तीच्या व्यक्ती असतात. मी जाड आहे म्हणून दुसराही जाडच असला पाहिजे असे नाही. दुसरा बारीक असू शकतो ना. आयुष्यातील संकटांचा सामना करण्याची पद्धतही प्रत्येकाची वेगळी असते. त्या व्यक्तीला त्या प्रमाणे त्याचा सामना करण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ओसाकाला हा अधिकार आहे, असेही सेरेना म्हणाली.

ओसाकाच्या मानसिकतेचा आधार घेत सेरेनाने व्यक्ती तशा प्रवृत्ती असतात याचा पुनरुच्चार केला. ती म्हणाली,’कठिण प्रसंगी मलाही पत्रकार परिषदेस जाणे अवघड होते. काय बोलायचे तेच कळत नाही. पण, असे प्रसंग मला अधिक कणखर करतात.ही माझी प्रवृत्ती आहे. ओसाकाची नसेल. तिच्या निर्णयाचे मी स्वागतच करते. ‘

माझी मानसिकता नीट नाही. मला विचलित व्हायचे नाही. त्यामुळे मी या स्पर्धेतून माघार घेत आहे,असे ओसाकाने म्हटले आहे. माझ्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मीच बाजूला होणे योग्य आहे. त्यामुळे अन्य खेळाडूंना आणि चाहत्यांना टेनिसकडे लक्ष देणे शक्य होईल, असेही ओसाका म्हणाली.

तिने माघार घेऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण, असा निर्णय घेताना नकळत तिने चूक देखिल केली. ती म्हणजे याबाबत पर्याय शोधता आला असता. माघारी हा पर्याय होऊन बसता कामा नये, असेही मार्टिना यांनी म्हटले आहे.