मांजामुळे पशू-पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास होणार ‘हि’ कारवाई

0
197

अमरावती,दि.२८(पीसीबी) : चिनी धागे, काचेचा चुरा आणि लोखंडाचे कण वापरून पतंगांचा मांजा बनवला जातो, अथवा तो तयार मिळतो. हा मांजा माणसांबरोबरच पक्षी आणि इतर वन्यजीवांसाठी घातक आहे. त्याच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध घालण्याचे आणि वापराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. तसेच तयार केलेला मांजा वापरल्यामुळे अनुसूचीतील वन्यप्राणी किंवा पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास पतंग उडवणाऱ्यांवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मांजामुळे पशू-पक्ष्यांना होणाऱ्या दुखापतीच्या संदर्भात पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवले होते. हानीकारक मांजामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या अनुसूचीतील वन्यप्राणी, पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्यांना दुखापत झाल्यास वन कायद्याच्या कलम ९ नुसार संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु या प्रकरणातील आरोपींना शोधण्याचे आव्हान वन विभागासमोर आहे.

दरम्यान मांजा वापराबाबत धोरण स्पष्ट नसल्याने खरेदी आणि विक्री करणाऱ्यांमध्ये संभ्रम असतो. आता वन विभागाने यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. मांजामुळे वन्यजीवांना दुखापत झाल्यास तो गुन्हा ठरणार आहे.