महिला पोलीस कर्मचाऱ्याला फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्यास अटक

0
427

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी महिलेला १०० या हेल्पलाईन नंबरवर फोन करून शिवीगाळ केली. फोन केल्यावर ‘बघून घेईल’ अशी धमकी आरोपीने दिली. ही घटना गुरूवारी (दि. २७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शिवाजी शहाजी समिंदर (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, औंध) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, २४ वर्षीय पीडित पोलीस कर्मचारी महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात पीडित पोलीस कर्मचारी महिला १०० नंबर हेल्पलाईन या फोन ड्युटीवर कार्यरत असताना आरोपीने गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. ‘पोलीस काही कामाचे, पोलीस खाते बंद करा’ असे म्हणत आरोपीने फोन करून कर्मचारी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच कर्मचारी महिलेला बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी, चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.