“महाशिवरात्री निमित्त शिवाची वैशिष्ठे सांगणारा महत्वपूर्ण लेख” – ‘भक्तांना सहज प्रसन्न होणारा आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणारा शिवशंकर!’

0
748

एखाद्या देवतेसंबंधी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान कळले, तर त्या देवतेविषयी आपली श्रद्धा अधिक वाढायला साहाय्य होते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि ती अधिक फलदायी होते. या दृष्टीने या सदरात शिवाची नावे, त्यांचा अर्थ आणि शिवाचे कार्य, शिवाची वैशिष्ट्ये, शिवोपासनेच्या विविध पद्धती, शिवाशी संबंधित घटक, शिवाशी संबंधित असुर, राजे आणि ऋषी, शिवाची गुणवैशिष्ट्ये, शिवाचे महात्म्य आणि काळानुसार धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी अवतार धारण करणे यांसारख्या सूत्रांची कारणमीमांसा येथे दिली आहे.

१. त्रिदेव : ब्रह्मा, विष्णु आणि महेश हे त्रिदेव आहेत. ते दत्तात्रेयांच्या रूपात त्रिमूर्ती बनून एकत्र वास करतात. ब्रह्मा निर्मितीचे, विष्णु पालन-पोषणाचे आणि शिव संहाराचे कार्य करतो. अशाप्रकारे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे कार्य त्रिदेव सक्षमपणे पूर्ण करतात.

२. शिवपरिवार : पार्वती, गणपति, कार्तिकेय, नंदी आणि शिवगण असा शिवाचा परिवार आहे. काही मतानुसार शिव विष्णूच्या मोहिनीरूपावर आसक्त झाल्यामुळे त्यांच्या संयोगाने अय्यपा देवाची निर्मिती झाली.

३. शिवाची रूपे : रुद्र, कालभैरव, वीरभद्र, भैरव (भैरवनाथ), वेताळ, भूतनाथ, नटराज आणि किरात ही शिवाची प्रमुख रूपे आहेत.

४. शिवलिंगाचे प्रकार : शिवाची मूर्ती सहजा आढळत नाही. शिव लिंगाच्या रूपाने वास करतो. शिवलिंगाचे पुढील प्रकार आहेत.

  अ. बारा जोतिर्लिंग : सोमनाथ, मल्लिकार्जुन, विश्‍वनाथ, घृष्णेश्‍वर, केदारेश्‍वर, आेंकारेश्‍वर, नागनाथ,          महाकाळेश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर, वैज्यनाथ, रामेश्‍वर आणि भीमाशंकर ही बारा ज्योतिर्लिंगांची नावे आहेत.

  आ. बाणलिंग : ज्याप्रमाणे गंडकी नदीतील दगडांना शाळिग्राम म्हणतात आणि त्यांचे पूजन केले जाते.            त्याचप्रमाणे नर्मदेतील गोट्यांना बाणलिंग म्हणतात आणि त्यांचे पूजन केले जाते.

  इ. पारदलिंग : हे अत्यंत दुर्लभ आणि सर्वश्रेष्ठ लिंग आहे. ते शिवाचे वीर्य मानले जाते. पारदलिंगाच्या पूजनाने    सर्व मनोकामना पूर्ण होतात.

  ई. आत्मलिंग : शिवस्वरूप आणि परम तेजस्वी असणार्‍या आत्मलिंगाची पार्वती नित्यनियमाने प्रतिदिन पूजन    करत असे. त्रेतायुगात रावणाने शिवाची स्तुती करण्यासाठी शरीरातील ७२ नाड्या वीणेप्रमाणे वाजवून                शिवतांडवस्तोत्र गायले आणि त्याला प्रसन्न करून घेतले. तेव्हा शिवाने त्याचे आत्मलिंग रावणाला दिले. हेच      आत्मलिंग घेऊन रावण पुष्पक विमानातून लंकेला निघाला होता. वाटेत गणपतीने गुराख्याचे रूप धारण करून    शिवाचे हे आत्मलिंग रावणाकडून प्राप्त करून घेतले आणि त्याची स्थापना भूमीवर केली. यालाच कालांतराने      ‘वैद्यनाथ ज्योतिर्लिंग’ हे नाव प्राप्त झाले.५. शिवाने धारण केलेली विविध नावे

  अ. नीलकंठ : समुद्र मंथनाच्या वेळी सर्वात प्रथम समुद्रातून विषाचा कुंभ बाहेर पडला. हे विष इतके जहाल होते    की, त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा विनाश झाला असता. विषाचा भयंकर प्रभाव पाहून देव, दानव आणि मानव यांचा      थरकाप उडाला. ‘विष पचवण्याचे सामर्थ्य केवळ शिवात आहे’, असे श्रीविष्णूने सांगितल्यावर सर्व देवगण          शिवाला शरण केले आणि त्याला प्रार्थना करू लागले. तेव्हा शिव प्रसन्न होऊन समुद्रतटी अवतरला आणि त्याने    क्षणार्धात हालाहल विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले. हालाहल प्राशनामुळे शिवाचा कंठ निळा झाले. त्यामुळे    भक्तगण त्याला ‘नीलकंठ’ म्हणून लागले.

  आ. नागेश्‍वर, नागनाथ किंवा नागेश : हालाहल विषाच्या दाहापासून रक्षण होऊन शीतलता प्राप्त करण्यासाठी      शिवाने पिवळ्या रंगाचे सात्त्विक ९ नाग धारण केले. त्यामुळे त्याला ‘नागेश’, ‘नागनाथ’ किंवा ‘नागेश्‍वर’ या      नावाने संबोधले जाऊ लागले.

  इ. चंद्रशेखर आणि चंद्रमोळी : समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या चंद्राला शिवाने स्वत:च्या कपाळावर धारण        केले. अशाप्रकारे शिव ‘चंद्रशेखर’ आणि ‘चंद्रमोळी’ या नावांनी अलंकारित झाला.

  ई. सोमनाथ किंवा सोमेश्‍वर : सत्ययुगात चंद्राने प्रभास क्षेत्री उपासना करून तेथे शिवलिंग स्थापन केले. चंद्राने    शिवलिंगाची स्थापना केल्यामुळे ते लिंग ‘सोमनाथ’ किंवा ‘सोमेश्‍वर’ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाऊ लागले.

  उ. भोलेनाथ : शिव सरळ स्वभावाचा आणि भोळा सांब असल्यामुळे त्याला ‘भोलेनाथ’ म्हणतात.

  ऊ. आशुतोष : ‘आशुतोष’ म्हणजे ‘लगेच प्रसन्न होणारा.’ शिव थोड्याशा उपासनेने त्वरित प्रसन्न होतो.          त्यामुळे त्याला ‘आशुतोष’ म्हणून गौरवले आहे.

  ए. त्रिपुरारी : शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यामुळे त्याचे ‘त्रिपुरारी’ नाव प्र्रचलित झाले.

  ऐ. गंगाधर आणि गंगेश्‍वर : भगीरथाच्या तपश्‍चर्येनेे प्रसन्न झाल्यावर गंगा वैकुंठातून पृथ्वीकडे येत असतांना      तिचा प्रचंड वेग पेलण्याचे सामर्थ्य केवळ शिवशंकरात होते. शिवाने जटेमध्ये गंगा धारण केल्यामुळे त्याला        ‘गंगाधर आणि गंगेश्‍वर’ ही नावे प्राप्त झाली.

  ओ. महादेव : शिव अनादी कालापासून असल्यामुळे त्याचे वय पुष्कळ आहे त्यामुळे ते वयोवृद्ध आहेत. शिव        परमज्ञानी असल्याने आणि ज्ञान अनंत असल्यामुळे ते ज्ञानवृद्ध आहेत. शिव निर्बीज समाधी अवस्थेत              असल्यामुळे त्यांच्या तपश्‍चर्या अखंड चालू असते. त्यामुळे ते तपोवृद्ध आहेत. अशाप्रकारे शिव ज्ञान, तप आणि    वय यांनी वृद्ध आहे. तो परिपूर्ण पावित्र्य, परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण साधना यांनी युक्त आहे. त्यामुळे सर्व        देवांमध्ये शिव श्रेष्ठ आणि महान आहे. त्यामुळे त्याला ‘महादेव’ म्हटले जाते.

  औ. रुद्र : शिव लयाशी संंबंधित देव असल्याने स्मशानामध्ये शिवतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते.          त्यामुळे स्मशानाला ‘रुद्रभूमी’ असेही संबोधले जाते. स्मशानाचा अधिपति रुद्र असतो. रुद्र म्हणजे रडवणारा.      मृत  व्यक्तीच्या अंत्येष्टीच्या वेळी त्याचे आप्तजन रडत असतात. वृष्टी करणारा आणि अत्याधिक                प्रजननशक्ती असणारा तो ‘रुद्र’. श्राद्धातील पितृत्रयींची वसु, रुद्र आणि आदित्य या गणात गणना केली जाते.      यांतील रुद्र हे शिवाचे उपरूप असून त्याचे कार्य लय आणि पितर अशा दोघांंशी संबंधित आहे.

  अं. मृत्युंजय : शिव उत्तर दिशेचा स्वामी आहे. दक्षिणेचा स्वामी यम आहे. शिवाने मृत्यूच्या देवतेवर अधिपत्य    स्थापन केल्यामुळे शिवाला ‘मृत्युंजय’ म्हटले जाते. अकाल मृत्यूचे संकट टळण्यासाठी मृत्युंजय शिवाची          उपासना आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

६. शिवाशी संबंधित घटक

  अ. शिव आणि कुंडलिनी : शिव आज्ञा चक्राची देवता आहे.

 आ. शिव आणि दिशा : शिव उत्तर दिशेचा स्वामी आहे.

 इ. शिव आणि पंचतत्त्व : शिव आकाशाशी संबंधित देवता आहे. पंचमुखी शिवाची ईशान आणि सदाशिव ही रूपे      आकाशाशी संबंधित आहेत.

 ई. शिवाचे कार्य : उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी लयाचे कार्य शिवाशी संबंधित आहे.

 उ. शिव आणि संबंधित शक्ती : शिव ज्ञानशक्तीशी निगडित आहे. विष्णु क्रियाशक्तीशी आणि ब्रह्मा                 इच्छाशक्तीशी संबंधित आहे.

 ऊ.शिव आणि देवी : शिवाची पार्वती, विष्णूची लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाची सरस्वती देवी आहे. (पार्वती, उमा,         गौरी, जगदंबा, काली, दुर्गा, चामुण्डा आणि माहेश्‍वरी या शिवाच्या आठ प्रमुख शक्ती आहेत.)

 ए. शिवाला प्रिय असणार्‍या वस्तू : बेल, पांढरी फुले, चिताभस्म, भांग, व्याघ्रांबर, डमरूनाद, रुद्राक्ष, पंचामृत

 ऐ. शिवाशी संबंधित स्थाने : बारा ज्योतिर्लिंग, काशी, कांचीपीठ, अमरनाथ, कैलास मानसरोवर आणि गोकर्ण       महाबळेश्‍वर आदी शिवाची प्रसिद्ध स्थाने आहेत. काशीच्या ठिकाणी स्वत: शिव काशीविश्‍वेश्‍वराच्या रूपाने           विराजमान असून ६४ योगिनी आणि ६४ भैरव तेथे विद्यमान आहेत.

७. शिवाशी संबंधित असुर, राजे आणि ऋषी

 अ. शिवाने नष्ट केलेल्या असुरांची नावे : महाबलाढ्य असणारे आणि त्रिपुरांची निर्मिती करणारे तारकापुत्र   तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युनमाली, समुद्रपुत्र शिवांशी जालंधर, दारुक, अंधकासुर, गजासूर अशा कित्येक   असुरांचा विनाश शिवाने जनकल्याणासाठी केला आहे.

आ. शिवकृपा प्राप्त झालेले भारतवर्षातील विविध शिवभक्त राजे

      आ १. राजा मान्धाता : राजा मान्धाताने नर्मदाकिनारी तपश्‍चर्या करून शिवाकडून नर्मदातटाला सिद्धक्षेत्राचा        आशीर्वाद प्राप्त करून घेतला.

      आ २. राजा चंद्रसेन : उजैनचा निस्सीम शिवभक्त राजा चंद्रसेन याच्या राज्यावर शत्रूने चढाई केल्यानंतर          त्याच्या संरक्षणासाठी शिवाने महाकालेश्‍वराचा अवतार धारण केला होता.

      आ ३. इक्क्ष्वाकुवंशी राजा ईल : आर्यावर्तात काम्यक वनाची निर्मिती करून ईल राजाला स्त्री होण्याचा              आशीर्वाद देऊन ईला बनवले. हा चमत्कार शिवशंकराने केला.

      आ ४. राजा धर्मसेनचे पुत्र राजकुमार नर आणि नारायण : केदारनाथ शिवलिंगाची निर्मिती करण्याचे                वरदान प्राप्त करणारे नर आणि नारायण हे परम शिवभक्त होते. त्यांच्यात साधनेची ओढ असल्याने त्यांनी        राजसुखाचा त्याग करून यतीचा वेश धारण केला आणि शिवशंभोला प्रसन्न करण्यासाठी हिमालयात हजारो        वर्षे तपश्‍चर्या केली.

      आ ५. राजा भगीरथ : कठोर तपश्‍चर्येने शिवाला प्रसन्न करून वैकुंठात वास करणारी परम पावन गंगानदी          पृथ्वीवर आणून शापित पूर्वजांसह समस्त मानव जातीचे कल्याण करणार्‍या परम शिवभक्त राजा                    भगीरथाचे उपकार भरतभूमीचे सुपुत्र कधीच विसरू शकणार नाहीत.

     आ ६. कृष्णभक्त अर्जुन : द्वापरयुगात महाभारताच्या युद्धाच्या आधी पांडव वनवास भोगत असतांना                श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून अर्जुनाने शिवाची आराधना करून पाशुपतास्त्र प्राप्त केले होते. अर्जुनाने पूजन              केलेले शिवलिंगच नेपाळ येथील ‘पशुपतिनाथ’ या नावाने विख्यात आहे.

इ. शिवाशी संबंधित ऋषी : पिपलाद, और्व, च्यवन, धौम्य, शिलाद, दधिची, गौतम, शौनक, मार्कंडेय, दुर्वास, जमदग्नी, कश्यप, अगस्ती आदी शिवभक्त ऋषींमुळे शिवभक्तीचा झरा भरतखंडात अखंड वहात आहे.

८. शिवाची गुणवैशिष्ट्ये

अ. शिवतत्त्व परमोच्च आणि सूक्ष्मतम आहे.

आ. शिवाचा संबंध ईश्‍वराच्या निर्गुण तत्त्वाशी आहे.

इ. शिवतत्त्वामुळे शांतीची अनुभूती येते.

ई. शिव वैरागी असल्यामुळे शिवोपासकामध्ये वैराग्य लवकर जागृत होते.

उ. शिव सर्वज्ञ असून तो परमज्ञानाचा स्रोत आहे.

ऊ. शिव हे ध्यान आणि ज्ञान या मार्गानुसार साधना करणार्‍या ऋषींचे उपास्य दैवत आहेत.९. शिवाचे महात्म्य

अ. शैव संप्रदायानुसार शिवच सृष्टीचा निर्माता असणे : समस्त सृष्टीची निर्मिती शिव आणि पार्वती यांनी              केल्यामुळे त्यांना ‘आदिपिता अन् आदिमाता’ असे संबोधले जाते.

आ. नृसिंह अवताराला शांत करण्यासाठी शरभ रूपी पक्षाचा अवतार घेणारे तारणहार शिवशंकर : हिरण्यकश्यपूचा      वध करण्यासाठी श्रीविष्णूने अत्यंत उग्र असणारे नरसिंह रूप धारण करून अवतार घेतला होता.                      हिरण्यकश्यपूचा वध करतांना नरसिंह अवताराची विक्राळता आणि उग्रता अत्यंत वाढली. दानवाचा वध              केल्यानंतरही ही उग्रता शांत होईना; तेव्हा उग्र नरसिंहाच्या क्रोधामुळे सृष्टी नष्ट होण्याचे भय निर्माण झाले.     ‘सृष्टीचे संरक्षण करण्यासाठी शिवाने ‘शरभ’ नावाच्या पक्षाचा अवतार धारण करून उग्र नृसिंहाला गाढ             आलिंगन देऊन शांत केले’, असा उल्लेख काही पुराणांमध्ये आढळतो.

इ. शिवशंकर अखंड साधनारत, परम विरक्त आणि महादानी असणे : शिव निर्बीज समाधी अवस्थेत राहून अखंड     साधना करणारे, वैराग्याचे व्रत धारण करणारा; समस्त सिद्धी, अपार शक्ती आणि समार्थ्य प्राप्त असूनही         शिवशंभो अत्यंत विनयशील अन् विरक्त आहे, महादेव परमयोगी आहे. शिव निरलेप आणि निरमोही आहे;         म्हणून समस्त सिद्धींचा अधिपती असूनही तो ऐश्‍वर्यापासून अलिप्त राहून सर्वसामान्य योग्याप्रमाणे बर्फाने         आच्छादलेल्या कैलासात निवास करतो. शिव निरमोही आणि विरक्त असल्यामुळे पार्वतीच्या हट्टापोटी               विश्‍वकर्म्याने निर्माण केलेली सुवर्ण लंका शिवाने विशर्वा ऋषींना सहर्ष दान केली होती.

ई. धौम्य ऋषींना आत्मज्ञान देणारा गुरु : अमरनाथाच्या गुहेत बर्फाने बनलेल्या शिवपिंडीत वास करून धौम्य         ऋषी, तसेच एका मतानुसार नाथपंथातील मच्छिंद्रनाथ यांना परम पावन शिवज्ञान देणारा गुरु स्वरूपातील         शिवशंकरच आहे.

उ. तंत्रविद्येचे जनक : पार्वतीची जिज्ञासू वृत्ती पाहून शिवाने पार्वतीला शिष्य म्हणून स्वीकारले आणि तिला         भैरवादी तंत्रविद्वेचे ज्ञान देऊन तंत्रविद्येत निपुण बनवले.

ऊ. शुक्राचार्यांना संजीवनी विद्या देणारे शिवशंभो : शिवभक्त शुक्रचार्यांची घोर तपस्या पाहून आशुतोष भगवान       शिव प्रसन्न झाला. त्याने मृताला पुनर्जिवित करण्याची ‘मृतसंजीवनी’ विद्या किंवा ‘शिवसंजीवनी’ विद्या         असुरांचे गुरु शुक्राचार्य यांना दिली.

ए. परशुरामाचे गुरु भोलेनाथ भगवान शिव : श्रीविष्णूने जेव्हा परशुरामाच्या रूपाने ६ वा अवतार धारण केला होता, तेव्हा त्याने कैलासक्षेत्री जाऊन शिवशंकराला गुरु मानून शिष्यत्व पत्करले. शिवाने प्रसन्न होऊन परशुरामाला ‘परशु’ हे शस्त्र दिले. सहस्त्रार्जुन, तसेच इतर दुर्जन क्षत्रिय यांचा नाश करण्याची आज्ञा आणि आशीर्वाद शिवानेच परशुरामाला दिला होता. शिवाच्या आशीर्वादानेच परशुरामाने क्षात्रधर्म साधना केली.

ऐ. शिवाने काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केलेला असणे : शिवाने काळावर विजय प्राप्त केल्यामुळे त्याला ‘महाकाळ’ असे संबोधले जाते. शिवामध्ये संपूर्ण वैराग्य असल्यामुळे मदनाने मारलेल्या कामबाणाचा शिवावर काहीच परिणाम झाला नाही. उलट शिवाने तिसरा नेत्र उघडून मदनाला, म्हणजे कामदेवालाच भस्म केले. अशाप्रकारे शिवाने काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केलेला आहे.

१०. काळानुसार धर्मसंस्थापनेच्या कार्यात सहभाग घेण्यासाठी अवतार धारण करणे

 अ. त्रेतायुग : त्रेतायुगात शिवापापासून निर्मिलेला अकरावा रुद्र ‘हनुमान’ याने श्रीविष्णूचा सातवा अवतार             श्रीराम याची दास्यभक्तीद्वारे सेवा करून रामलीलेत सहयोग दिला.

आ. द्वापरयुग : द्वापरयुगातही हनुमानाने अर्जुनाच्या रथावर आरूढ होऊन धर्माच्या बाजूने लढणार्‍या पांडव         सैन्याचे संरक्षण केले.

इ. कलियुग : कलियुगात हिंदु धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्मसंस्थापनेचे कार्य करण्यासाठी शिवगुरु आणि     आर्यांबा या दांपत्याच्या पोटी केरळ येथील कालाडी या ग्रामात ‘शंकर’ रूपातील मानवी अवतार धारण केला.       तेच पुढे ‘आदि शंकराचार्य’ या नावाने विख्यात झाले.

११. शिवाची उपासना

अ. शिवाची प्रमुख व्रते : प्रदोष व्रत, सोळा सोमवार व्रत, श्रावणी सोमवार, शिवामूठ, हरितालिका आणि                महाशिवरात्र इत्यादी

आ. शिवाशी संबंधित यज्ञ : मृत्युंजययज्ञ, रुद्रस्वाहाकार, अतिरुद्रस्वाहाकार, महारुद्रस्वाहाकार इत्यादी

इ. शिवाशी संबंधित स्तोत्र : शिवतांडव स्तोत्र, शिवमहिम्नस्तोत्र, शिवकवच इत्यादी

ई. शिवाशी संबंधित मंत्रजप :

  १. पंचाक्षरी मंत्र : ॐ नम: शिवाय ।

  २. शिव गायत्री मंत्र : तत्पुरुषाय विद्महे । महादेवाय धीमहि । तन्नो रुद्र: प्रचोदयात् ॥

  ३. महामृत्युंजय मंत्र : ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

उ. शिवाशी संबंधित संप्रदाय : पाशुपत, कापालिक, अघोर, शैव आणि वीरशैव (लिंगायत) हे शिवाशी संबंधित         प्रमुख संप्रदाय आहेत. त्याचबरोबर शिव नाथ पंथाचेही आराध्य दैवत आहेत. नाथ पंथातील प्रमुख दोन             शाखांपैकी एक शाखा शिवोपासक आहे, तर दुसरी शाखा दत्तोपासक आहे.