महाविकास आघाडीला बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा?

0
704

मुंबई, दि.२७ (पीसीबी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच अखेर मंगळवारी घडलेल्या नाट्यमय राजकीय घडमोडीनंतर सुटला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्रीपदासाठी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज (बुधवार) सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आलेल्या बहुनज विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सत्ता आमची असेल, असे म्हणत महाविकासआघाडीला पाठिंबा देत असल्याचे संकेत दिले आहेत.

याशिवाय बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपाला समर्थन दिलेले नसल्याचीही माहिती समोर येत आहे. तर, बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांना सोबत घेण्याचा महाविकास आघाडीकडून विचार सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले. या बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी राजभवनवर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला.