महाराष्ट्रात भाजप नंबर वन, तर राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरू शकतो; शिवसेनेला फटका शक्य

0
2204

मुंबई, दि. १० (पीसीबी) – राज्यात चार केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक लढवली. त्यातील नितीन गडकरी सोडल्यास इतर मंत्र्यांच्या जागा धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा भाजप जिंकू शकेल, मात्र शिवसेनेच्या जागा घटू शकतील, असाही अंदाज आहे. राष्ट्रवादी पहिल्यांदाच दोन आकडी संख्या गाठून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकेल. विदर्भ व मुंबईत अपेक्षित यश मिळाले तर काँग्रेसही दोन जागांवरून दोन आकडी जागा गाठू शकते आणि तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकते. शिवसेनेची मात्र चौथ्या क्रमांकावर घसरण होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीलाही एखाद्या जागेची लॉटरी लागू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

राजकीय जाणकारांच्या मते महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात विदर्भातील मतदारांनी “पंजा”ला पसंती दिल्याचे चित्र आहे. २०१४ मध्ये १० पैकी १० जागा जिंकणाऱ्या भाजप- शिवसेना युतीला विदर्भात यंदा किमान चार ते पाच जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात शिवसेनेचे गड मानले जाणाऱ्या औरंगाबाद, परभणीत वर्षानुवर्षे तेच ते चेहरे तसेच न झाल्या कामांमुळे जनतेत रोष आाहे. त्यामुळे या मतदारसंघांतही शिवसेनेला धक्का बसण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे या भागात वंचित बहुजन आघाडीचा मात्र काँग्रेसला फटका बसू शकतो. २०१४ मध्ये काँग्रेसने राज्यात दोनच जागा राखलेल्या नांदेड व हिंगोलीत ‘वंचित’चे उमेदवार चालल्याने अशोक चव्हाणांची चांगलीच दमछाक झाली. येथील निकालही धक्कादायक लागू शकतात.

पश्चिम महाराष्ट्रात या वेळी राष्ट्रवादीने पूर्ण ताकद लावली. हातकणंगलेत राजू शेट्टींना मदत केली, तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंसाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरलेले दिसले. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी बारामतीत जाऊन थेट पवारांनाच आव्हान दिले. मंत्री चंद्रकांत पाटीलही तिथे सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी तळ ठोकून बसले होते. या भागात भाजप जितक्या त्वेषाने लढला तेवढी शिवसेना दिसली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला गेल्या वेळपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूरमध्ये मात्र आघाडीतील अंतर्गत वादाचा राष्ट्रवादीला फटका बसू शकतो. उत्तर महाराष्ट्रातील दक्षिण नगरची जागा सुरुवातीला एकतर्फी वाटली, मात्र इथे ‘विखे पाटील विरुद्ध शरद पवार’ असाच चुरशीचा सामना रंगल्याने सुजय विखेंनाही विजयासाठी चांगलेच लढावे लागले.

कोकणातील रायगडमध्ये राष्ट्रवादीला यंदा संधी आहे, तर रत्नागिरीत शिवसेना गड राखू शकेल. तेच ते चेहरे तसेच न झालेल्या कामांमुळे मुंबईतील एक-दोन जागी शिवसेनेला फटका बसू शकतो. मुंबईत युती कागदावरच राहिल्याचे अनेक ठिकाणी प्रकर्षाने जाणवले. मनसेने आपली ताकद काँग्रेसच्या मागे उभी केल्याचे चित्र होते.