महाराष्ट्रातील लोकसभेच्या ८९ उमेदवारांवर गंभीर गुन्हे; १०९ उमेदवार हे कोट्याधीश

0
685

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या २९ एप्रिल रोजी निवडणूक होत असून ‘महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफार्म्स’ (एडीआर) या संस्थेने उमेदवारांच्या आर्थिक, शैक्षणिक तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे त्यांच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे विश्लेषण केले आहे. त्यांच्या विश्लेषणानुसार निवडणूक लढवत असलेले १०९ उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या सबळ असून ८९ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

‘महाराष्ट्र इलेक्शन वॉच’ आणि ‘असोसिएशन फॉर डेमोक्रटीक रिफार्म्स’ (एडीआर) या संस्थेने केलेल्या या विश्लेशनात ८९ उमेदवारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, महिला अत्याचार यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या सर्वांनी गुन्हेगारीची प्रकरणे दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात घोषित केले आहे. यापैकी ६४ उमेदवारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची नोंद आहेत. दोन उमेदवारांच्या विरोधात तर गुन्हे सिद्ध झाले असून वंचित बहुजन आघाडीचे नाशिकचे उमदेवार पवन पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

तीन उमेदवारांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय दहा उमेदवारांनी आपल्या विरोधात महिला अत्याचाराशी सबंधित दोन उमेदवारांनी त्यांच्यावर अपहरणाशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचे जाहीर केले आहे. गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे दाखल असलेल्या उमेदवारांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या १७ उमेदवारांपैकी ७, बहुजन समाज पक्षाच्या १५ उमेदवारांपैकी ४, काँग्रेसच्या ९ उमेदेवारांपैकी ४, भाजपच्या ७ उमेदवारांपैकी ४, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ पैकी ५ उमेदवारांचा समावेश आहे.