महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

0
263

सुर्यापेठ-तेलंगणा, दि. २५ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी आज झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यातही विजय मिळवत “४७व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची” बाद फेरी गाठली. येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला ३८-३० आणि मुलांच्या इ गटात मुलांनी तामिळनाडूला ३८-२० असे पराभूत करताना गटविजेते म्हणूनच बाद फेरी गाठली. मुलांची सिक्कीमशी, तर मुलींची छत्तीसगडशी उपउपांत्यपूर्व लढत होईल.

रात्री उशीरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाला ६२-१२ असे नमवित सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. मध्यांतराला ३७-०७ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने नंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. आज देखील तोच जोश दाखवित पंजाब या बलाढ्य संघाला ८ गुणांनी नमवित साखळीतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे मुलींनी ह गटात प्रथम स्थान पटकावित बाद फेरी गाठली. हरजितसिंग, मानसी रोडे, समृद्धी कोळेकर, कोमल ससाणे यांनी महाराष्ट्राकडून दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली.

महाराष्ट्राच्या मुलांनी इ गटात आज सकाळी झालेल्या सत्रात तामिळनाडू सारख्या बलाढ्य संघाला नमवले. पूर्वार्धातच दोन लोण देत मुलांनी विश्रांतीलाच २८-०९ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत ती आपल्या हातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या अगोदर रात्री उशीरा झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगढला ७४-२३ असे सहज नमवले. मध्यांतराला ३७-११ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील आक्रमक खेळाची झलक दाखवीत हा सामना सहज खिशात टाकला. या दोन्ही सामन्यात आकाश रुडाले, तेजस पाटील, शुभम पटारे, रोहित बिन्नीवाले, सुरेश जाधव यांनी चढाई-पकडीचा सर्वोत्तम खेळ केला.

मुलांत महाराष्ट्रा बरोबरच साई, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदिगड, दिल्ली, गोवा, सिक्कीम, तमिळनाडू, पंजाब, गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश, आंध्रप्रदेश यांनी, तर मुलींच्या गटात महाराष्ट्रासह हरियाना, छत्तीसगड, साई, तेलंगणा, चंदिगड, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, हिमाचल, राजस्थान, बंगाल, दिल्ली, झारखंड, गोवा, पंजाब यांनी बाद फेरी गाठली.