सामाजिक सुरक्षा पथकाचा जुगार अड्ड्यावर धडाकेबाज छापा

0
527

थेरगाव, दि. २५ (पीसीबी) – थेरगाव गावठाणात मारुती मंदिराच्या समोर सुरु असलेल्या रम्मी जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारला. त्यात पोलिसांनी 13 जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. जुगार खेळणा-यांकडून पोलिसांनी 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) दुपारी करण्यात आली.

उमेश विठ्ठल बारणे, रामराम नामदेव जाधव, अनिल नथ्थू पवार, चंद्रकांत श्रीपती पिसाळे, गोविंद दत्तूबा गुजर, अरुण सीताराम बारणे, विजय दासा झेंडे, विकास बिभीषण जगताप, सुनील बारणे, सतीश भगवान गवारी, बाळासाहेब तुकाराम बणगे, मोहन मुरलीधर होळकर, वजीर मेहबूब सौदागर (सर्व रा. वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव गावठाण येथे मारुती मंदिरासमोर पारावर काहीजण पैसे लावून रम्मी नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार एका पथकाने कारवाई करून 13 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या कारवाईमध्ये 51 हजार 800 रुपये रोख रक्कम आणि 240 रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 52 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.