महायुतीमधील घटकपक्षांकडून चार मंत्रीपदांची मागणी; ‘रिपाइं’ला हवे कॅबिनेट मंत्रिपद

0
357

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सध्या राज्यात सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. एकीकडे भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत असताना, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्षांकडून चार मंत्रीपदांसह महामंडळावरील विविध पदांची मागणी करण्यात आली आहे. शिवाय, ‘रिपाइं’कडून एक कॅबिनेट मंत्रीपदही मागण्यात आले आहे. दोन ते तीन दिवसात मंत्रीमंडळाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी महायुतीतील घटकपक्षांकडून करण्यात आलेली आहे. घटकपक्षांची बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत रिपाइंचेनेते रामदास आठवले यांनी बैठकीतील विविध ठरावांची माहिती दिली.

यावेळी आठले यांनी सांगितले की, जनतेच्या प्रयत्नामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येत आहे. त्यामुळे याबद्दल जनतेचे आभार व्यक्त करण्याच ठराव बैठकीत घेण्यात आलेला आहे. याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची भाजपा आणि मित्रपक्षांच्या नेतेपदावर निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता ते मुख्यमंत्री बनण्यात कोणतीही अडचण राहिलेली नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचे देखील आभार व्यक्त करण्याचा ठराव आम्ही घेतलेला आहे. तसेच, त्यांनी दोन-तीन दिवसांत मंत्रीमंडळाबाबत निर्णय घ्यावा, मंत्रिमंडळ निर्मितीसाठी फारवेळ लावू नये, असे देखील आम्ही आवाहन करणार आहोत.

याचबरोबर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील लवकरात लवकर निर्णय घ्यावा व सरकार हे महायुतीचंच बनावं असा देखील ठराव बैठकीत घेण्यात आला आहे. सरकार स्थापन होत असताना त्यात आमच्या चारही पक्षांना चार मंत्रिपदं मिळावीत, याबरोबर महामंडाळांवरील विविध पदांवर देखील आम्हाला संधी मिळावी, असा देखील ठराव घेण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची आम्ही भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. रिपाइंला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही यावेळी आठवले यांनी विशेष नमूद केले. तसेच, यावेळी त्यांनी विनोदाने हे देखील म्हटले की चारही घटकपक्षांकडून जर कॅबिनेट मंत्रीपदांची मागणी करण्यात आली, तर जे एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असेल ते देखील मिळणार नाही.