महापौर महाडेश्वरांवर तत्काळ गुन्हा दाखल करा – रुपाली चाकणकर

0
797

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथे जाब विचारणाऱ्या महिलेचा हात पिरगळून तिला अपशब्द वापरल्याने त्यांच्याविरोधात ३५४ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.  

काही दिवसांपूर्वी सांताक्रूझ पूर्व या महाडेश्वर यांच्या मतदारसंघात पाणी साचल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन मायालेकींचा मृत्यू झाला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच महापौर म्हणून त्यांची जबाबदारी असतानाही त्यांनी कुठलीही कृती केली नाही, म्हणून संतापलेल्या महिलांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला.यावेळी जाब विचारणाऱ्या महिलेलाच महापौर महाडेश्वर यांनी दमदाटी केली तसेच सर्वांसमोर तिचा हात पिरगळला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

महापौर पदावर असलेल्या व्यक्तिला हे शोभत नाही. त्यामुळेच ज्या प्रमाणे एरवी पोलिस आंदोलकांवर किंवा अन्य प्रकारामध्ये सुमोटो दाखल करून कारवाई करतात, तशीच कारवाई कायद्यातील कलम ३५४ नुसार तत्काळ गुन्हा दाखल करावा आणि महाडेश्वर यांनी आपल्या महापौर पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी चाकणकर यांनी केली.