महापालिका व खाजगी रुग्णालयातील जागांची (बेड) माहिती पालिकेच्या कोरोना डँश बोर्डवर दाखवा – नाना काटे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

0
210

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – सरकारी व खाजगी रुग्णालयातील जागांची (बेड) माहिती महापालिकेच्या कोरोना डँश बोर्डवर दाखवावी अशी आग्रही मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

निवेदनात काटे म्हणतात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसोदिवस वाढतच चालला आहे. शहरात आज अखेर ८७६२ सकारात्मक कोरोना बाधित सापडले असून सुमारे ३२६० कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. रोज चारशे- पाचशेच्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्ट मध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून १० ते १५ हजार होईल, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्याबाबत टेस्ट करण्यासाठी दोन दिवस लागतात त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्यास मदत होते. त्यामुळे कोरोना टेस्ट लवकर होऊन त्याचा परीणाम लगेच समजणे आवश्यक त्या दृष्टीकोनातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे एखादा नागरीकाचा कोरोना सकारात्मक अहवाल आल्यास सध्या कोरोनाच्या दहशतीमुळे घाबरुन जातो. रुग्णालयात गेल्यास रुग्णालयात जागा शिल्लक नाही दुस-या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. दोन तीन रुग्णालये फिरल्यानंतर त्याला एखाद्या रुग्णालयात जागा मिळते परंतु तोपर्यंत एक दोन दिवसाचा अवधी जातो व तो रुग्ण अजून खचून जातो. कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात जागा न मिळाल्यामुळे पुण्यामध्ये एका रुग्णांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील नागरीक भयभित झालेले आहेत. त्यामुळे खाजगी व सरकारी रुग्णालयातील कोरोनासाठी किती बेड अथवा जागा शिल्लक आहेत व त्यामुळे सामान्य, ऑक्सिजन व व्हेंटीलेटर वरील किती जागा शिल्लक आहेत हे मध्यवर्ती यंत्रणा उभारुन शहरातील रुग्णांना समजल्यास रुग्णांना नेमकी माहिती मिळून त्या रुग्णालयात दाखल होऊन त्याचा वेळ वाचेल त्या दृष्टीकोनातून मनपाच्या कोविडच्या डँशबोर्डवर खाजगी व सरकारी रुग्णांलयामध्ये सामान्य, ऑक्सिजन व व्हेंटीलेटरच्या जागा किती शिल्लक आहेत यांची रोजच्या रोज माहिती टाकल्यास कोरोनाबाधित रुग्णांना नेमकी माहिती मिळेल व रुग्ण घाबरुन जाणार नाहीत.

सौम्य प्रकारची कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्या रुग्णांस आवश्यक त्या गोळ्या देऊन घरीच विलगीकरण होण्यास सांगितले जाते. सध्याच्या कोरोनाच्या महामारीमुळे शहरातील प्रत्येक नागरीक प्रचंड घाबरलेला आहे. त्यामुळे कोरोनापेक्षा कोरोनाच्या भितीमुळेच नागरीकांचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे घरी राहणा-या कोरोना रुग्णांस किंवा शहरातील नागरीकांना कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी.

कोरोनाची सौम्य लक्षणे आढळ्यास कुठे संपर्क करावा, स्वँब टेस्ट कुठे करावी याबाबतची संपूर्ण माहिती हेल्पलाईनवर उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. आपल्याकडे सारथी हेल्पलाईन उपलब्ध आहे त्या हेल्पलाईनवर कोरोनाबाबत काय खबरदारी घ्यावी अथवा कोरोना झाल्यास कुठे संपर्क करावा इत्यादी माहिती या हेल्पलाईनवर उपलब्ध करुन द्यावी. शक्य झाल्यास कोरोनाबाबत समुदेशन करण्यात यावे. म्हणजे शहरातील नागरीकांमध्ये कोरोनाबाबत घबराट होणार नाही, असे काटे यांनी सुचविले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी व खाजगी रुग्णालयाची कोरोना बाधित रुग्ण ठेवण्याची क्षमता आताच संपलेली आहे. त्यामुळे येथून पुढे कोरोना बाधित रुग्णांसाठी वेगळी सोय करावी लागणार आहे. यासाठी सक्षम आराखडा तयार करण्यात आलेला आहे काय ? शहरातील मंगल कार्यालयातील साखरपुड्याचे हॉल व जेवणाचे हॉलचा उपयोग कोरोना बाधित रुग्णांसाठी करता येईल त्या दृष्टीकोनातून शहरातील मंगल कार्यालय ताब्यात घेण्यात यावीत. तसेच मनपाचे थेरगाव येथील रुग्णालय बांधून सज्ज आहे तिथे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन ते सुध्दा कोरोना बाधित रुग्णांसाठी वापरता येईल तसेच पिंपळे सौदागर काटे वस्ती येथील शक्ती हॉस्पिटल हे खाजगी रुग्णालय मनपाने मिळकत न भरल्याने सील करण्यात आले आहे. ते सुध्दा याप्रसंगी वापरता येईल का ? याची चाचपणी करुन शक्य असल्यास ते सुध्दा त्वरीत चालू करावे. त्याच प्रमाणे शहरातील मनपाच्या मिळकती ब-याच प्रमाणात आहेत. त्या मिळकतीमध्ये लाईट – पाणी याची सोय आहे तेथे फक्त शौचालयाची सुविधा केल्यास या मिळकती सुध्दा कोरोनाबाधितांसाठी वापरता येतील. तसेच दिनांक रोजी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे (पाटील) व मी स्वत: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोरोना बाधित रुग्णांसाठी पिंपरी येथील एच.ए. कंपनीच्या मोकळ्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपाचे ५००० बेडचे रुग्णालय उभारणेबाबत तसेच इतर काही सुचना दिल्या होत्या. त्यांच्यावर आतापर्यंत काही अंमलबजावणी झाली का ? अशा विविध प्रकारचे उपाय कोरोना बाधितांसाठी आतापासूनच करणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन पावसाळ्यामध्ये या रुग्णांना ठेवणे अवघड होईल. त्यामुळे आता पासूनच कृतीशील आराखडा तयार करुन या रुग्णांसाठी जय्यत तयारी मनपा प्रशासनास करावी लागेल, असे काटे यांनी म्हटले आहे.