आमदार लक्ष्मण जगताप यांची कार्यपध्दत चुकते काय ?

0
776

थर्ड आय – अविनाश चिलेकर –
——————————-
पिंपरी चिंचवड शहरात सलग २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची एक प्रकारे जहागिरी होती. ते सांगतील ती पूर्व दिशा, ते बोट ठेवतील तो महापौर, तो आमदार अशी परिस्थिती होती. राजकारणात एक साचलेपण आले आणि धुसफूस वाढत गेली. फाटाफूट झाली आणि दादांचे सरदार, वतनदार शत्रुपक्षाला म्हणजे थेट भाजपला मिळाले. केंद्र-राज्य भाजपकडे असल्याने सत्तेचे वारे त्या दिशेने वाहत होते. त्यामुळे ऐकेकाळी अवघे २-४ नगरसेवकांची ताकद असलेला भाजपचा फुगा फुगला. तीन वर्षांपूर्वी महापालिकेत सत्ता आली. त्याचे श्रेय निश्चितच आमदार लक्ष्मण जगताप यांना आणि त्यासाठी ज्यांनी ज्यांनी जीवाचे रान केले, मोर्चेबांधनी केली त्या सर्वांना जाते.
खुशमस्कऱ्यांच्या कोंडाळ्यात अडकले म्हणून…

ब्रिटीश साम्राज्यावरचा सुर्य मावळत नाही असे म्हटले जाई, अगदी तशीच अवस्था पिंपरी चिंचवडची होती. खुद्द अजित पवार यांनी स्वप्नातसुध्दा पराभव पाहिलेला नाही, त्यांचा इथे पाडाव झाला होता. आमदार जगताप यांनी जमावजमव, जोडतोड केली आणि पहिल्याच झटक्यात बारामतीकर दादांना चारी मुंड्या चीत केले. राज्यात त्याची विशेष चर्चा झाली कारण जगतापांनी वाघ मारला होता. भाजपच्या जुन्या जाणत्यांनाही इथे सत्ता येईल याची शाश्वती नव्हती. आता भाजपच्या सत्तेला सव्वातीन वर्षे लोटली. अल्पावधीत सत्तेची धुंदी चढली, एक दर्प, मस्ती आली. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता कधीकधी त्याचे अस्तित्व संपवते, असे म्हणतात. आज पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपची तीच गत आहे. सत्तेच्या नशेत भाजप भ्रष्ट झाला आहे. दादा पवारांची जागा आमदार जगताप यांनी घेतली, पण त्यांना दादा होता येत नाही आणि साहेबांची (शरद पवार) सावलीसुध्दा बनता येत नाही हे दिसले. खाण तशी माती अशी एक म्हण आठवते. खरे तर, आमदार जगताप हे साहेबांच्या तालमीत तयार झाले. पवार साहेबांचे सर्वसमावेशक राजकारण, दूरदृष्टी, विरोधकांप्रती आदर, दुसऱ्याचे ऐकून निर्णय घेण्याची मनोवृत्ती, कायम जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या सुखदुःखातील सहभाग या गुणांचा आभाव आमदार जगताप यांच्यामध्ये कटाक्षाने दिसतो. एक प्रकारची हुकूमशाही भाजपमध्ये आणि महापालिकेतही आल्याचे कार्यकर्तेच सांगतात. हायर अँन्ड फायर म्हणा की यूज अँन्ड थ्रो म्हणा हा आमदारांचा खाक्या. त्यामुळे त्यांचे निस्सिम भक्त की समर्थक असलेले उजवे-डावे असे शेकडो चांगले कार्यकर्तेच त्यांच्या विरोधात गेले. नामावली खूप मोठी आहे. प्रशांत शितोळे, राहुल कलाटे, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप, मयूर कलाटे, नाना काटे, विलास नांदगुडे, सचिन चिंचवडे, मारुती साळुंखे, संदीप वाघेरे, अपर्णा डोके, निलेश डोके, राजू मिसाळ आदी असंख्य नावे घेता येतील. नाराजी आहे पण उघडपणे दाखवत नाहीत असे शे पाचशे कार्यकर्ते असतील. पदे देऊनसुध्दा केवळ आमदारांच्या स्वभावाने नंतर दूर गेले. पदासाठी डावलले असेही अनेक आहेत. त्यामुळे आमदार जगताप यांना पावला पावलावर विरोधक तयार झालेत. एकजण चूकतो, दुसरा चूकतो पण सगळेच मुर्ख आणि मी एकटाच शहाणा असे होते. त्यावेळी कुठेतरी स्वतःचेच चुकते आहे हे निश्चित. परिस्थिती अशी आहे की, आपल्या नेत्याला तोंडावर हे सगळे सांगायची हिंमत कोणात नाही. कारण आमदार जगताप यांच्याकडे तो समंजसपणाही राहिलेला नाही. त्याचा परिणाम बुडत्याचा पाय खोलात असे झाले. गुणवंतांना धुडकावत भाटगिरी करणाऱ्या, चमचे, हुजरे यांच्या कोंडाळ्यात अडकल्याने असे होते. कुठेतरी चुकतेय हे समजून घ्या. अन्यथा सत्तेचा ताम्रपट कोणीही घेऊन आलेले नाही, हेसुध्दा लक्षात असू द्या.

शहराचे लोकनेते होण्याची धमक, पण –
पिंपरी चिंचवड शहराला म्हणून एक लोकनेता हवा आहे. गेली ३०-४० वर्षे स्थानिक लोक त्याच प्रतिक्षेत आहेत. इथल्या राजकारणाची ती खूप मोठी कमतरता आहे, हे आजवरच्या अनेक चर्चांतून सर्वेक्षणांतून दिसले. इथल्या राजकारानेन कूस बदलली त्यावेळी लोक खुश होते, कारण आमदार जगताप ती जागा घेतील अशी आशा होती. ती धमक त्यांच्यात होती पण त्यांचा स्वभाव त्या आड आला. आमदार जगताप यांच्याकडे साम, दाम, दंड, भेद असे सर्व आहे, पण आता मनुष्यबळाची बोंब आहे. जगताप खुशमस्कऱ्यांच्या वर्तुळात अडकलेत. दरबारी राजकारणामुळे त्यांचे बरेच तोटे झाले, पण त्यांना तेही समजून घ्यायचे नाही. आमदार जगताप यांचेही सामर्थ्य होते काही अंशी आजही आहे, पण ते विखुरले गेले. कारण प्रत्येकाला तोडून बोलण्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ते दुरावले. शहरातील तमाम गावकी त्यांच्या मागे खंबीरपणे उभी होती. आता ते चित्र राहिलेले नाही. एक एक तटबंदी ढासळत गेली पण त्याचीही त्यांना फिकीर नाही. ३५ वर्षे राजकारणात एक लोकसभेचा पराभव वगळता नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, आमदारकी अशी चढती कमान राहिली. त्यात त्यांचे कर्तुत्व आहे. पैशाने सर्व जिंकता येते असे नाही, लोकसभेला त्याचा अनुभव आला आहे. त्यामुळे थोडे सावध असा. मोदींच्या पक्षात केवळ मोदी, फडणवीस आणि त्यांच्या विचारधारेमुळे लोक मते देतात हे विसरू नका. आजही तेच चलणी नाणे कायम आहे. खरे तर, या शहराला एक धडाकेबाज खमक्या नेता पाहिजे. वेळ गेलेली नाही, त्यांना अजूनही खूप मोठी संधी आहे. जग फिरत असल्याने ते शहराला वेगळी दिशा देतील अशी अपेक्षा अजूनही आहे. तीन विधानसभा मतदारसंघाची तुलना केली तर पिंपरी व भोसरी पेक्षा चिंचवड आज उठून दिसते, कारण आमदार जगताप यांचे काम. त्यांनी पूर्ण शहराचा विचार केला पाहिजे ते होत नाही. चिंचवड, पिंपरी जगताप यांचे आणि भोसरी लांडगे यांचे अशी शहराची फाळणी करणे हेसुध्दा गैर आहे. शहराची वाटणी हा आता चर्चेचा विषय आहे.भाजपची प्रतिमा राष्ट्रवादीपेक्षा अधिक बदनाम झाली कारण फक्त ठेकेदार, टक्केवारी, दादागिरी या पलिकडे चर्चा होत नाही. भय व भ्रष्टाचार मुक्ती तसचे नको बारामती नको भानामती या घोषणेवर विसंबून लोकांनी मते दिली. प्रत्यक्षात त्यातले आज काहीच, कुठेच दिसत नाही. शहराची प्रतिमा घडविण्याचे काम त्यांना करायचे आहे. केवळ गावगुंडांना बरोबर घेऊन शहर गुंडापुंडांचे होईल. जमिनीवर ताबे मारणारे, भूखंड लाटणारे हेच नगरसेवक होणार सतील तर उद्या भाजपचीसुध्दा इथे माती होईल. मोदी प्रेमीना ते अपेक्षित नाही. रा.स्व.संघ आता तुमच्या बरोबर येईल का नाही याबाबत साशंकता आहे, कारणे अनेक आहेत. या शहरात बिल्डर, ठेकेदार वगळता हजारो गुणवंत आहेत. शहराची वैचारिक मशागत कऱण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्य, कला, क्रीडा तसेच शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, पत्रकार यांच्याशी संवाद करायला हवा, जे आजवर आमदार जगतपा यांनी कधीच केलेले नाही. पैशातून राजकारण आणि राजकारणातून पैसा हे दृष्टचक्र आहे. शहराला त्यातून बाहेर काढायचे की त्या खोल विहिरीत ढकलायचे हे आमदार जगताप यांनीच ठरवावे. या शहराचे हाँगकाँग करायचे स्वप्न साकरले पाहिजे, परंतु, पिंपळे गुरव, सौदागर हेच हाँगकाँग वाटते हे दुर्दैव आहे. सर्व शक्य आहे, फक्त इच्छाशक्ती हवी बस्स. मोदी, शरद पवार तेच करतात. आमदार जगताप यांना जमायला हरकत नाही.

नगरसवेकांची ठेकेदारी, भागीदारी संपणार कधी –
शरद पवार यांच्यावर कित्तेक गंभीर अरोप झाले पण त्यांनी त्याला तितकेसे महत्व कधीच दिले नाही, म्हणून ते मोठे झाले. मोदी यांच्यावर दंगलीसह कितीतरी आरोप विरोधकांनी केले, पण ते त्याला बधले नाहीत म्हणून आज पंतप्रधान झाले. ते आदर्श समोर ठेवा. आजही पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार हा एखाद्या ग्रामपंचायतीसारखा आहे. आमदार जगताप यांनी मनात आणले तर तो मेट्रो सिटी सारखा होईल. यांत्रिक साफसफाईचा ठेका, कचऱ्याचा ठेका, खोदाईचा ठेका, पुलाचे काम, रस्त्याचे काम देताना देश-विदेशात काय चालले ते पहा. त्या ठेक्यांचीच चर्चा होते आणि बिल आमदारांच्या नावावर फाटते. हे थांबले पाहिजे. पाच-सात हजार कोटींचे बजेट असलेली ग्रामपंचायत आणि गावचे सरपंच असेच महापालिकेचे काम ठेवायचे असेल तर मग आहे असेच चालू द्या. देशात सर्वाधिक संधी असलेले हे शहर आहे, मग त्यात या मातीतील माणसाला कुठे किती स्थान देता येईल याची दिशा दाखविण्याचे काम आमदार जगताप यांनी केले पाहिजे. मोदींनी त्यांच्या घरातील एकाही पाहुण्याला ठेकेदार अथवा भागीदार केलेले नाही. आमदार जगताप यांच्या बद्दल तो एक मोठा गंभीर आक्षेप आहे, त्याचे निराकरण आमदार जगताप यांनी केले पाहिजे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की,नगरसेवकांनी ठेकेदारी करू नये, भागीदारी करू नये. इथे एकही काम असे नाही ज्यात नगरसेवक चा वाटा नाही. राष्ट्रवादीच्या काळात हे होते, पण त्याची चर्चा अथवा बोभाटा होत नव्हता. भाजपच्या काळात कंबरेचे सोडून हे काम चालले याला आक्षेप आहे. पुन्हा सत्ता पाहिजे असेल तर हे चक्र उलटे फिरवावे लागेल. आमदार जगताप हे घरचे मोप गडगंज श्रीमंत आहेत, त्यामुळे आमदार जगताप जनतेच्या पैशावर डल्ला मारणार नाहीत. पण जे चोऱ्या करतात त्यांचा हात धरणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच थोडे कठोर व्हावे लागेल. आमदार जगताप यांनी रा.स्व.संघ अथवा भाजप विचारांची झूल पांघरली, पण ते संस्कार, आचार, विचार अद्याप त्यांच्या रक्तात भिनलेले नाहीत. बारामतीकरांच्या तालमितील मातीच त्यांच्या अंगावर दिसते. राम दाखविण्यासाठी छाती फाडून दाखविण्याची गरज नाही, कृतीतून रामराज्य दिसले तर लोक आमदार जगताप यांना सांहासनावर बसवून त्यांचा राज्याभिषेकही करतील. त्या दिवसांची वाट पाहू या…