महापालिका निवडणूक! मतमोजणी केंद्र, संवेदनशील मतदान केंद्रांवर असणार ‘सीसीटीव्ही’ची नजर

0
200

पिंपरी दि. १६- पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीवेळी कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कामकाजावर लक्ष राहावे, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्र, संवेदनशील मतदान केंद्रांवर असणार ‘सीसीटीव्ही’ची नजर राहणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यावरील हरकती व सुचनांवर 25 फेब्रुवारीला सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आराखड्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आरक्षण सोडत पार पडेल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.   शहरातील 46 प्रभागांमधून 139 नगरसेवक निवडण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने कामाला सुरूवात केली आहे.

शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गैरप्रकार रोखण्यास मदत होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. निवडणुकीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याकरिता महापालिकेच्या दूरसंचार विभागाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. 100 कॅमेरे व त्यासाठी लागणारी यंत्रणा घेण्यासाठी महापालिकेने 89 लाख 28 हजार रुपये खर्च निविदेमध्ये नमूद केला होता. त्यामध्ये मेसर्स वैभव एंटरप्रायजेस यांनी 3.50  टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यानुसार 86 लाख 16  हजार 58  रुपयांमध्ये त्यांनी काम करण्यास समर्थता दाखवली आहे. त्यानुसार निविदेमधील अटी व शर्तीनुसार त्यांच्याकडून करारनामा करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

दूरसंचार विभागाचे कार्यकारी अभियंता थॉमस नरोन्हा म्हणाले,”निवडणुकीमध्ये गैरप्रकार घडू नयेत यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आवश्यक आहे. शहरातील जे केंद्र संवेदनशील आहेत, त्या केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून नजर ठेवण्यास मदत होणार आहे. निवडणुकीसाठी 100 कॅमेरे वापरण्यात येणार आहेत”