‘महाआघाडी सरकारची बेअब्रू’ – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
337

महाराष्ट्राच्या इतिहासात आजवर एकाही सरकारची इतकी बेअब्रू झाली नसेल. कोरोनामुळे राज्याचे आरोग्यच संकट आले, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, सचिन वाझे अटक प्रकरण आणि परमबीर सिंह यांनी केलेले १०० कोटीच्या वसुलिचे गंभीर आरोप. या सगळ्याच प्रकरणांमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीसुध्दा नाचक्की झाली.

२२ वर्षाच्या पूजा चव्हाण या मुलीवर अत्याचार केला आणि आत्महत्येला जबाबदार ठरले म्हणून शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना घरी जावे लागले. तिसऱ्या पत्नीचे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँन्ड नेते आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कपाळ झोडून घ्यायची वेळ आली. सरकारमध्ये असे काही व्याभिचारी मंत्री बसलेत याचेही दर्शन झाले. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते त्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसची त्यात कोंडी झाली. पूर्वीच राजीनामा दिला असता तर नैतिकतेची चाड आहे, असे म्हणता आले असते. आता तो आव आणून काही उपयोग नाही. उच्च न्यायालयाने सीबीआय कडे प्रकऱण सोपविल्यावर आता लंगोटही उरणार नाही, हे लक्षात आल्यावर राजीनामा दिला. आता ठाकरे सरकारवर वसुली सरकारचा शिक्का अधिक गडद झाला. भाजपाचे किरीट सोमय्या म्हणतात, आता पुढची शिकार परिवहन मंत्री अनिल परब आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात या आठवड्यातच हा राजीनामा झालेला दिसेल. भाजपाचे दुसरे संकटमोचक गिरीष महाजन म्हणतात आता यापुढे राजीनामा देणाऱ्यांची माळ लागलेली दिसेल. देशमुखांचा राजीनामा हे हिमनगाचं टोक, आगे आगे देखो…होता है क्या? अशी महाजन यांची दर्पोक्ती आहे. आता हा सिलसिला संपणार नाही, आणखी काही मंत्र्यांची नावे भाजपाच्या लेखी तयार आहेत, असेही म्हणतात. केंद्रातले मंत्री प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनीही आता आघाडी सरकरावर हल्लाबोल केला. भाजपाने राज्यातील महाआघाडी सरकारला चहुबाजुंनी अगदी पध्दतशीर घेरलेले दिसते. अशात हे तीन पायांचे सरकार टिकाणार का नाही याची शाश्वती देता येत नाही.

१०० कोटींच्या आरोपाचे मूळ अजूनही सापडलेले नाही. वसुली करणारा गृहमंत्री आणि बॉम्ब ठेवणारा पोलिस हा देशाने प्रथमच पाहिल्याची राजकीय टीका महाराष्ट्रातील तमाम जनतेला घायाळ कऱणारी आहे. मनसुख हिरेनच्या खुनातील मुख्य आरोपी पोलीस सहनिरीक्षक सचिन वाझेचा गॉडफादर कोण तेसुध्दा अद्याप समजलेले नाही. शिवेसनेने वाझे याचे समर्थन का केले त्याचेही स्पष्टिकरण आलेले नाही. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनआयए) बरीच खोदाई केल्याने आता यापुढे मोठ मोठे स्फोट होतील, अनेकांची बोलती बंद होईल, अशी अटकळ आहे. महाआघाडीचे सरकारसुध्दा कोसळेल, असेही म्हणतात. तूर्तास कोरोनाच्या महासंकटावर मात करण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिझी आहेत, पण सर्व वादावर त्यांचे कुठलेही वक्तव्य येत नसल्याने गूढ आणखी वाढले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद दिल्लीत प्रेस कॉन्फरन्समध्ये `मुख्यमंत्री गप्प का`, असा प्रश्न उपस्थित करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सुध्दा आजारपणामुळे मौन बाळगून आहेत. देशमुख यांना वाचविण्याचा सगळा आटापिटा संपला. आता त्यांचा राजीनामा झाला असला तरी खरी कसोटी पुढेच आहे. कारण १५ दिवसांत सीबीआय १०० कोटींच्या आरोपांबाबत प्राथमिक अहवाल देणार आहे. सीबीआय आणि एनआयए अशा दोन मोठ्या तपास संस्थांचा अहवाल काय असेल ते माहित नाही. भाजपा आता अधिक हल्ले करायच्या मूडमध्ये आणि राष्ट्रवादी, शिवसेना हे बचावात्मक पवित्रात आहे.

‘राष्ट्रवादीचे बोटावर निभावले, आता टार्गेट शिवसेना’ –
राष्ट्रवादीच्या जीवावरचे संकट बोटावर निभावले. आता भाजपाचे पुढचे खरे टार्गेट शिवसेना आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सरळ मार्गी व्यक्ती. देशमुख यांच्या निमित्ताने परमबीर सिंह, सचिन वाझे आणि आता वाझे च्या निमित्ताने थेट शिवसेना भाजपाच्या हिट लिस्टवर म्हणजेच रडारवर आहे. देशमुख यांचा राजीनामा झाल्याने राष्ट्रवादीवरचे संकट तूर्तास काहीसे विरळ झाले. देशमुख यांना वाचविण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पाणी थेट गळ्यापर्यंत येते म्हटल्यावर पवार यांनी देशमुख यांचे बोट सोडले. सर्वोच्च न्यायालयाने १०० कोटींचे प्रकऱण गंभीर आहे असे ताशेरे ओढूनही राष्ट्रवादीला काहीच फरक पडला नव्हता. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर अखेर नैतिकतेच्या मुद्यावर देशमुख यांचा बळी दिला गेला आणि राष्ट्रवादीने स्वतःचा हात सोडवून घेतला.`सचिन वाझे म्हणजे कोणी लादेन आहे का ? “, असा सवाल खुद्द मुख्यमंत्र्यांनी थेट विधीमंडळात केला तेव्हाच सगळे संपले. कारण सचिन वाझे याला संरक्षण देणारे कोण हे तिथेच स्पष्ट झाले. सर्वात मोठी घोडचूक झाली. वाझे याची नियुक्ती कोणी केली, का केली याचा नंतर पंचनामा झाला आणि शिवसेना व वाझे यांचे थेट कनेक्शन जगासमोर आले. वाझे याच्या ७-८ अलिशान कार, त्यात नोटा मोजायचे मशिन, फोनवरचे सर्व मसेजेस, मीठी नदितून बाहेर काढलेले पुरावे, अनेक सीसी फुटेज हे सगळे इतके बोलके आहे की पुढे काय होणार हे सांगायला आता भविष्यकाराची गरज नाही. अनिल देशमुख यांनी मुंबईतून एका महिन्यासाठी १०० कोटींची वसुली करायचे टार्गेट दिले होते की नाही, त्यात वाझेचा सहभाग किती वगैरे आता एक एक धागेदोरे जोडून समोर येईल. पण त्यात पोलिस दलाचे जे मनोबल खच्ची झाले ते भरून निघणे कठीण आहे. बदल्या, बढत्यांसाठी सहा महिन्यांपूर्वी शिवसेना का रुसून बसली होती, त्याचे कारणही आता लोक १०० कोटींमध्येच शोधतात. ज्यांनी कायदा सुव्यवस्था राखायची तेच इतके बरबटलेले असतील तर सामान्य जनतेला न्याय कुठून मिळणार. पोलिसाचे कोणा एकणार. कायद्याचा धाक काय राहणार असे अनेक प्रश्न आहेत. आणि या सर्व परिस्थितीला जबाबदार एकटे अनिल देशमुख नाहीत, तर ही मोठी साखळी आहे. या गूढ कथेमधला सुत्रधार कोण ते अद्याप बाकी आहे. पण न सांगताच लोक नाव घेतात, हे खूप चिंताजनक आहे. गेले दोन महिने सुरू असलेला हा तमाशा सरकराचा बळी घेऊनच संपणार असे दिसते. तसे झाले तर राष्ट्रवादीचे जहाज फुटेल आणि शिवसेनेतही दुफळी माजेल अशीही शक्यता आहे. कारण भाजप एकट्या जीवावर (१०५ आमदार) सत्ता आणू शकत नाही. पुढे काय होते ते आता तिसऱ्या अंकात पाहू….